मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेची कांजूरमार्ग येथील कारशेड पुन्हा वादात अकडली आहे. कांजूरमार्गची जागा ‘मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आक्षेप घेत केंद्र सरकारने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केंद्र सरकारच्या यासंबंधीच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुरुवारी न्यायालयाने कारशेडच्या कामास स्थगिती दिली. न्यायालयाने कारशेडची जागा ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे कांजूरमार्ग कारशेडचा प्रश्न निकाली निघाला असे वाटत असतानाच ती पुन्हा वादात अडकली आहे. कारशेडचे काम बंद झाल्याने ‘मेट्रो ६’ मार्गिकेला फटका बसणार आहे.

‘मेट्रो ६’ मार्गिकेसाठी कांजूरमार्ग येथे कारशेड उभारण्याचा निर्णय २०१६ मध्ये घेण्यात आला होता. राज्य सरकारने यासंबंधीच्या प्रस्तावास मान्यताही दिली होती. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतर केंद्र सरकार, मिठागर आयुक्तांनी या जागेवर मालकी हक्क दाखवत तेथे कारशेड उभारण्यास विरोध केला आणि उच्च न्यायालयात धाव घेतली. राज्य सरकारने ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा केला आणि एकूणच कांजूरमार्ग कारशेड वादात अडकली. एका खासगी विकासकानेही या जागेवर दावा करून न्यायालयात धाव घेतली. मात्र, महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांनी ‘मेट्रो ३’चे कारशेड कांजूरमार्ग येथून हलवून पुन्हा आरे परिसरात नेले. त्यानंतर कांजूरमार्गच्या जागेबाबतचा वाद २०२२ मध्ये संपुष्टात आला होता.

हे ही वाचा… न्या. चंद्रचूड यांच्या व्याख्यानाने ‘विचारोत्सवा’ला प्रारंभ; ‘लोकसत्ता लेक्चर’ उपक्रमाची आजपासून सुरुवात

हे ही वाचा… बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : आरोपीला लुधियानातून अटक

हा वाद संपुष्टात आल्यानंतर कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागा ‘मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यात आली. ही जागा ताब्यात आल्यानंतर एमएमआरडीएने निविदा प्रक्रिया पूर्ण करून कारशेडच्या कामाचे कंत्राट दिले आणि कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली. मात्र, आता हे काम गुरुवारपासून बंद करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने गुरुवारी कांजूरमार्ग येथील कारशेडची जागा ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले आहेत. त्यामुळे कारशेडचे काम पुन्हा रखडले असून यामुळे एमएमआरडीएची चिंता वाढली आहे. कारशेडचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते. मात्र, आता कारशेडच्या कामाला पुन्हा खीळ बसली आहे.