मुंबई : त्या काळात सरकार अनुदान देत नसतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी लोकांकडे भीक मागून शाळा उभारल्या. आता मात्र संस्थाचालक शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात, असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
महापुरुषांनी शाळा सुरू करताना सरकारकडे अनुदान मागितले नाही, तर लोकांकडे भीक मागितली. त्या काळात दहा रुपये देणारे होते, आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) निधीतून दोन टक्के खर्च करण्याची सध्या कायदेशीर तरतूद आहे, असे विधान पाटील यांनी पैठण येथील कार्यक्रमात गुरुवारी केले. त्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे.
भाजपनेते बौद्धिक दिवाळखोरीत निघाल्याने महापुरुषांचा अपमान करणारी वक्तव्ये करताना त्यांना संकोच वाटत नाही. महापुरुषांनी लोकांकडून वर्गणी आणि देणगी जमा करून बहुजन समाजातील गोर-गरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडली. पाटील यांना भीक, लोकवर्गणी आणि देणगी यांतील फरक तरी कळतो का, असा सवाल पटोले यांनी विचारला आहे. भाजपमध्ये वाचाळवीर आहेत, हे पाटील यांनी पुन्हा दाखवून दिले. महापुरुषांनी लोकवर्गणीतून शाळा उभारल्या आणि स्वत:चाही पैसा खर्च केला. त्यांनी भीक मागितली नाही. पाटील यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला.
महापुरुषांनी ‘भीक’ मागितली, असे वक्तव्य करून उच्च शिक्षणमंत्री पाटील यांनी महापुरुषांच्या महान कार्याचा आणि बहुजन समाजाचाही अपमान केला आहे.
– नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
पाटील यांनी मंत्रीपदासाठी काय भीक मागितली, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करून चालणार नाही, योग्य धडा शिकविण्याची वेळ आली आहे.
– अमोल मिटकरी, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
विरोधकांचे सर्व आरोप खोटे आहेत. त्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे.
– चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री