मुंबई : मुंबई बाँबस्फोटातील फाशीची शिक्षा झालेला प्रमुख सूत्रधार याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणावरून वादंग अजूनही सुरूच आहे. ‘आमच्यात हिंमत होती, म्हणून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढलो,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर याकूबचा चुलतभाऊ रौफ मेमन याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबरची छायाचित्रे काँग्रेस व शिवसेनेने समाजमाध्यमांवर प्रदर्शित करून भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

याकूबच्या कबरीच्या सुशोभीकरणासाठी दुबईतून आदेश आले. बडा कब्रस्तानच्या विश्वस्तांना धमक्या आल्या. त्याबाबत तक्रार करूनही तत्कालीन अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई केली नाही, असा आरोप मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केला. तर आम्ही हिंमत दाखविल्याने सर्वोच्च न्यायालयात मध्यरात्री सुनावणी होऊन याकूबला पहाटे फासावर लटकविले गेले, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी याकूबचा चुलत भाऊ रौफ मेमन याचे राज्यपाल कोश्यारी व फडणवीस यांच्याबरोबरची छायाचित्रे प्रदर्शित करून जोरदार प्रत्युत्तर देत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही या छायाचित्रात दिसत आहेत.

Story img Loader