राजापूर/ रत्नागिरी/ मुंबई : कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून वादंग निर्माण झाला आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणासाठी असलेला स्थानिकांचा विरोध पोलीस बळाचा वापर करून मोडून काढत मंगळवारी ड्रिलिंगचे काम सुरू करण्यात आले. पोलिसांनी सुमारे ११० आंदोलकांना ताब्यात घेतले. त्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले असून, पोलिसांची दडपशाही थांबवून काम स्थगित करण्याची मागणी करीत विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारसू परिसरात प्रकल्पाच्या दृष्टीने आवश्यक प्राथमिक कामाला गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक पातळीवर जोरदार विरोध सुरू आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ग्रामस्थांनी सर्वेक्षणाचे काम तीव्र विरोध करून बंद पाडले. या आठवडय़ापासून सुरू होणाऱ्या माती परीक्षणासाठी ड्रिलिंगच्या कामालाही विरोध होणार, याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनाने गेल्या रविवारपासून बारसूसह आजूबाजूच्या आठ गावांमध्ये संचारबंदी लागू केली. मात्र, ग्रामस्थांनी सोमवारी दिवसभर बारसूच्या सडय़ावर ठिय्या मांडला. सोमवारी काही नागरिकांना घरी पाठवण्यात आले. मात्र, आंदोलकांच्या एका गटाने आंदोलनस्थळी रात्रभर पहारा दिला. प्रशासनानेही सुमारे दोन हजार पोलिसांचा फौजफाटा या परिसरात तैनात केला. सोमवारी कोणतीही कारवाई झाली नाही. मंगळवारी सकाळपासून मात्र येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस बंदोबस्तात काही खासगी गाडय़ा येत असल्याचे दिसल्यावर महिलांनी बारसू सडा येथील रस्त्यावर लोळण घेत गाडय़ा रोखल्या. यावेळी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत ११० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि आधीच तेथे आणून ठेवलेल्या एसटी गाडय़ांमध्ये बसवून रत्नागिरीत आणले. तसेच घटनास्थळी वार्ताकन करत असलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनाही तेथून हुसकावून लावले.

मंगळवारी पोलीस बळाचा वापर करून ड्रिलिंगचे काम सुरू करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले असले तरी स्थानिक ग्रामस्थांचा विरोध लगेच मावळण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुढील काही दिवस या परिसरात तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी देवेंदर सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुळकर्णी यांनी प्रकल्पविरोधी ग्रामस्थांच्या प्रतिनिधींशी मंगळवारी संध्याकाळी संवाद साधला. ‘‘प्रकल्प विरोधकांचे म्हणणे ऐकून, त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाचे काम केले जाणार आहे. येत्या गुरुवारी या विषयावर तज्ज्ञांच्या उपस्थितीत राजापुरात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात विरोधकांनी मते मांडावीत, त्यांच्या शंका किंवा प्रश्नांची योग्य उत्तरे दिली जातील’’, असे जिल्हाधिकाऱ्यांनी या शिष्टमंडळाशी चर्चा करताना स्पष्ट केले. यावेळी प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव उपस्थित होत्या.

दोघांना सशर्त जामीन

या प्रकरणी गेल्या रविवारी अटक करण्यात आलेले सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांची पुढील दोन आठवडे रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश न करण्याच्या शर्तीवर जामिनावर मुक्तता करण्यात आली.

बारसू येथे हरित तेलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यासाठीची जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच निवडली होती. त्यांनी तसे पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले होते. मग आता या प्रकल्पास विरोध कशासाठी आणि ही सुपारी कोणाकडून घेतली?-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

स्थानिक रहिवाशांचा विरोध असताना सरकार हा प्रकल्प का रेटत आहे? उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून नागरिकांवर दडपशाही सुरू आहे. सरकारला जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे वागायचे आहे का?- संजय राऊत, खासदार, ठाकरे गट

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy has arisen over the proposed refinery at barsu in rajapur konkan amy
Show comments