मुंबई : पाकिस्तान, बांगलादेश व पॅलिस्टाईन झेंड्यांवर मुर्दाबाद लिहिलेल्या स्टीकरवरून सांताक्रुझ पूर्व परिसरत दोन गटांमध्ये वाद झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी स्वतः तक्रार करून गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक शांतता बिघडवल्याच्या आरोपाखाली ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांताक्रुझ पूर्व येथील बनारसी हॉटेलजवळील घंटेश्वर मंदिरासमोर शनिवारी रात्री हा वाद झाला. तेथे पाकिस्तान, बांगलादेश व पॅलिस्टाईन यांच्या झेंड्यावर मुर्दाबाद लिहिलेल्या भित्तीचित्रावरून (पोस्टर) दोन गटात वाद झाला. सार्वजनिक ठिकाणी गर्दी गोळा करून हाणामारी करून सार्वजनिक शांतता बिघडल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी वाकोला पोलीस शिपायाच्या तक्रारीवरून ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर संपूर्ण परिस्थिती शांत झाली. स्थानिक उपायुक्तांनी स्वतः प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची समजूत काढली व परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात शांतता आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.