पुत्रप्राप्तीचा आक्षेपार्ह भाग वगळण्याची राज्याची मागणी
मधु कांबळे, लोकसत्ता
मुंबई : वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रीक फिजिशियन हिप्पोक्रॅट्स यांच्या नावाने शपथ देणे बंद करून, आयुर्वेदातील चरक संहितेचे जनक चरक यांची शपथ देण्याचे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ठरविले आहे. परंतु पुत्रप्राप्तीच्या विधीचा आणि चातुर्वण्य व्यवस्थेचा चरक संहितेत उल्लेख असल्याने चरक शपथेवरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. चरक संहितेतील हा आक्षेपार्ह भाग अभ्यासक्रमातून वगळावा, अशी मागणी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने केंद्राकडे केली आहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आयुर्वेदाच्या पदवी (बीएएमएस ) व पदव्युत्तर पदवी (एमएस प्रसूतीशास्त्र स्त्रीरोग) अभ्यासक्रमात चरक संहिता शिकविली जाते. या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात पुसंवन विधी म्हणजे पुत्रप्राप्तीचा विधी तसेच शुद्रासाठी इच्छित पुत्रप्राप्ती कशी करावी यासंबंधीचा उल्लेख आहे. पुत्रप्राप्तीच्या उल्लेखामुळे केंद्र सरकारच्या गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याचा (पीसीपीएनडीटी), तसेच संविधानातील सामाजिक समता व स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाचाही भंग होतो. त्यामुळे चरक संहिता अभ्यासक्रमातून वगळावी, अशी तक्रार २०१६ मध्ये पहिल्यांदा गणेश बोऱ्हाडे या सामाजिक कार्यकर्त्यांने राज्याच्या आरोग्य विभागाकडे केली होती. त्याची दखल घेऊन राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक अर्चना पाटील यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाला पत्र पाठवून चरक संहितेतील पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग करणारा तसेच संविधानातील समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन करणारा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यासंबंधी अभिप्राय मागवून घेतला होता.
आरोग्य विद्यापीठाच्या अभिप्रायानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान व राज्य आरोग्य सेवा आयुक्त यांनी वैद्यकीय व आयुर्वेदाच्या विविध शाखांचा अभ्यासक्रम ठरविणाऱ्या केंद्रीय वैद्यकीय परिषदेचे सचिव यांना पत्र पाठवून, चरक संहितेतील आक्षेपार्ह भाग वगळण्याची विनंती केली. राज्याच्या आरोग्य विभागानेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला तसा पत्रव्यवहार केला होता, परंतु त्यावर पुढे काही कार्यवाही झाली नाही. अलीकडेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने वैद्यकीय पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रीक फिजिशियन हिप्पोक्रॅट्स यांच्या नावाऐवजी चरक यांच्या नावाने शपथ देण्याचे ठरविले आहे. त्याला राज्याच्या वैद्यकीय विभागाने थेट विरोध केला नसला तरी चरक संहितेतील आक्षेपार्ह भाग अभ्यासक्रमातून वगळण्याची नव्याने मागणी केली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. चरक शपथ घेणे हा व्यापक विषय आहे, परंतु त्यातील आक्षेपार्ह भाग वगळावा हा महत्त्वाचा मुद्दा आहे, असे त्यांनी सांगितले.