मुंबई : झोपडपट्टीवासीयांचे मिठागरांच्या जमिनींवर पुनर्वसन करण्याच्या केंद्रीय उद्योग व वाणिज्यमंत्री आणि उत्तर मुंबईतील भाजप उमेदवार पीयूष गोयल यांच्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला आहे. झोपडपट्टी रहिवासी ही हाडामांसाची माणसे असून श्रमिक मुंबईकर त्यात राहातो. त्यांना मिठागरांच्या जमिनींवर विस्थापित न करता सध्याच्याच ठिकाणी घर मिळाले पाहिजे, असे स्पष्ट करीत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षां गायकवाड यांनी गोयल यांनी मुंबईकरांची माफी मागावी व आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे. तर भाजपची नीती ‘गरिबी हटाव’ नसून ‘गरीब हटाव’ अशी असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 झोपटपट्टीवासीयांना सध्याच्याच ठिकाणी चांगले घर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून विरोधक मुंबई आणि झोपडपट्टीवासीयांच्या विकास योजनांना आंधळेपणाने विरोध करीत असल्याचे प्रत्युत्तर गोयल यांनी दिले आहे.  उत्तर मुंबई मतदारसंघासह शहरातील झोपडपट्टीवासीयांना चांगले व हक्काचे घर मिळवून देण्यासाठी मिठागरांच्या जमिनींसह अन्य जमिनींवर विविध योजना राबविल्या जातील. धारावीतील झोपडपट्टीवासीयांचेही पुनर्वसन केले जाईल. माझा मतदारसंघ झोपड़पट्टीमुक्त होईल व ती पद्धत (मॉडेल) अन्यत्रही वापरले जाईल, असे वक्तव्य गोयल यांनी केले होते. त्यावरून ठाकरे, वर्षां गायकवाड, प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी गोयल यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.

हेही वाचा >>> महापालिकेच्या कंत्राटदाराकडून खंडणी उकळणारी टोळी अटकेत

 यासंदर्भात गायकवाड म्हणाल्या, भाजपच्या आत्मनिर्भर व विकसित भारताच्या संकल्पनेत गरिबांना जागा आहे का? गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय नेत्यांचा दौरा असला की झोपडपट्टया दिसू नयेत, यासाठी पांढरे कापड किंवा कटआऊट लावले जातात. झोपडपट्टीवासीयांनाही माणूस समजले जावे. काँग्रेसने झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) योजना सुरू करून अनेकांना घरे दिली. या रहिवाशांना त्याच जागी पुनर्वसनाचा किंवा घर मिळण्याचा कायद्याने हक्क आहे. पण गोयल यांना झोपडपट्टीवासीयांना मिठागरांच्या जमिनींवर हद्दपार करायचे आहे.

सावंत यांनीही गोयल यांना झोपडपट्टीवासीयांबाबत घृणा असल्याची टीका केली. मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या बांधवांचे जीवनमान सुधारावे, यासाठी त्यांना जागेवरच चांगली घरे दिली पाहिजेत. पण भाजप आणि अदानी हे धारावीतील जनतेला मुलुंड येथे हद्दपार करीत आहेत आणि गोयल उत्तर मुंबईतील जनतेला हद्दपार करून खारजमिनीवर पाठवू इच्छितात. हे रहिवासी आमचे बांधव असून झोपडपट्टया या गुरांचे गोठे नाहीत, अशी टीका करीत सावंत यांनी गोयल यांचा निषेध केला आहे.

गरीब हटावही भाजपची नीती? आदित्य ठाकरे यांची टीका

झोपडपट्टीवासीयांना मिठागरांच्या जमिनींवर पाठवून मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याची गोयल यांची योजना आहे. झोपडपट्टयांमधील गरीब जनता निवडणूक रोखे खरेदी करू शकत नसल्याने त्यांना त्यांच्या हक्काच्या जागेवरून हटविले जात आहे. यावरून भाजपची नीती ही ‘गरिबी हटाव’ नसून ‘गरीब हटाव’ अशी आहे, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ठाकरे म्हणाले,  मुंबईतील झोपडपट्टी रहिवाशांचा आवाज बांधकाम व्यावसायिक किंवा शासकीय यंत्रणांना दाबून टाकता येणार नाही. केंद्रात गेली दहा वर्ष हुकुमशाही सरकार असून झोपडपट्टीतील रहिवाशांना हटवून ती जागा त्यांना आपल्या उद्योजक मित्रांना देण्याची योजना आहे. त्यासाठी गोयल यांनी मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याची जाहीर केलेली योजना भीतीदायक आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कांजूरमार्ग येथील जागा मेट्रो आगारासाठी केंद्र सरकारकडे मागण्यात आली होती. त्यामुळे राज्याचे दहा हजार कोटी रुपये वाचणार होते पण ही जमीन देण्यास गोयल यांनी राज्य सरकारला स्पष्ट नकार दिला होता. मुंबईच्या विकासात मिठाचा खडा टाकण्याचे काम गोयल यांनी त्यावेळी केला, असा आरोप ठाकरे यांनी केला.

त्याच जागी पुनर्वसन -गोयल

मुंबईतील प्रत्येक झोपडपट्टीवासीयाचे त्याच जागी पुनर्वसन करताना त्याला चांगले घर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईला आपले घर मानणाऱ्या प्रत्येकाच्या आकांक्षा व स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता या शहरामध्ये आहे. मुंबईला जगातील एक सर्वोत्तम शहर म्हणून विकसित करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना व संकल्पना आखण्यात आल्या आहेत. पण त्याला आंधळेपणे विरोध करून झोपडपट्टीवासीयांना सध्याच्याच स्थितीत व दुर्लक्षिलेल्या वाईट अवस्थेत ठेवण्याचा विरोधकांचा मानस आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व निराश, हताश आणि लयाला गेले असून ते झोपडपट्टीवासीयांच्या समस्येवर उपाययोजना करू शकत नाहीत, पण केवळ समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे प्रत्युत्तर गोयल यांनी दिले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands zws