केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शिक्षकांना पुरस्कार देण्यावरून सत्ताधाऱ्यांमध्येच मतभेद

मुंबई : सीबीएसई, आयसीएसईसारख्या केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शिक्षकांना महापौर पुरस्कार द्यायचा की नाही यावरून सत्ताधारी शिवसेनेत सुरू असलेला वाद अखेर सोमवारी चव्हाटय़ावर आला आहे.

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमधील शिक्षकांनाही महापौर पुरस्काराच्या निवड प्रक्रियेत सहभागी करण्याची मागणी महापौरांनी केली आहे. मात्र महापौरांच्या मागणीला शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षांनी कडाडून विरोध केला आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा पालिकेचे नियम धाब्यावर बसवीत असून अशा शाळांमधील शिक्षकांचा महापौर पुरस्कारासाठी विचार करू नये, अशी मागणी करीत शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षांनी महापौरांना घरचा आहेर दिला आहे.

काही दिवसांपूर्वी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केंद्रीय शिक्षण मंडळाच्या सीबीएससी आणि आयसीएससी शाळांमधील शिक्षकांनाही महापौर पुरस्काराच्या प्रक्रियेत समाविष्ट करावे, अशी मागणी केली होती. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमधील शिक्षकांना महापौर पुरस्कार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून सात परिमंडळातील किमान दोन शिक्षकांचा महापौर पुरस्कारासाठी विचार करावा, अशी मागणी करणारे पत्र नगरसेविका प्रज्ञा भूतकर यांनी शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांना पाठविले असून हे पत्र प्रशासनाकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आले होते. या पत्रावरील अभिप्राय प्रशासनाने सोमवारच्या शिक्षण समितीच्या बैठकीत सादर केला. या अभिप्रायाच्या निमित्ताने झालेल्या चर्चेदरम्यान शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर यांनी महापौरांना घरचा आहेर दिला. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा पालिकेचे कोणतेच नियम पाळत नाहीत. पालिकेच्या शिक्षण विभागाशी आपण संबंधित नाही, शिक्षण विभागाचे कोणतेच नियम आपल्याला बंधनकारक नाही, असे  या शाळांकडून सांगितले जाते. मग अशा शाळांमधील शिक्षकांचा महापौर पुरस्कारासाठी विचार करू नये, अशी मागणी मंगेश

सातमकर यांनी केली. ही आपली वैयक्तिक मागणी आहे, पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असेही मंगेश सातमकर यांनी स्पष्ट केले.

नगरसेवक अवाक् 

महापौर पुरस्काराबाबत महापौरांनीच केलेल्या मागणीच्या परस्परविरोधी विधान शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकाने सोमवारी शिक्षण समितीच्या बैठकीत केल्यामुळे अन्य नगरसेवक अवाक्  झाले.

Story img Loader