मुंबई : मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असताना गुरुवारी रात्री मोठी घडामोड घडली. बहुप्रतीक्षित नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचा कार्यक्रम ९ ऑगस्टला जाहीर करण्यात आला होता. मात्र, अवघ्या नऊ दिवसांतच अचानक राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप नेते अ‍ॅड्. आशिष शेलार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नोंदणीकृत पदवीधरांच्या अंतिम मतदारयादीतील त्रुटींकडे लक्ष वेधल्यामुळे निवडणूक स्थगितीचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक स्थगितीबाबत विद्यापीठाने गुरुवारी रात्री उशिरा अचानक परिपत्रक काढल्यामुळे एकच खळबळ उडाली. तसेच विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाचे तसेच निराशेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, सरकारच्या आदेशानुसार बैठक घेऊन पुन्हा योग्य तो निर्णय घेण्यात येईल. नोंदणीकृत पदवीधरांची निवडणूक रद्द केलेली नाही तर स्थगित केली आहे. स्थगिती उठवल्यानंतर उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी एक दिवस वाढवून देण्यात येईल, असे प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. सुनील भिरुड यांनी स्पष्ट केले.

भाजप नेते आमदार अ‍ॅड्. आशिष शेलार यांनी ७ ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीच्या नोंदणीकृत पदवीधरांच्या अंतिम मतदारयादीतील त्रुटींबाबत पत्र पाठविले होते. शेलार यांच्या तक्रारीनंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने तातडीने गुरुवारी, १७ ऑगस्टला मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांना पत्र पाठवून याप्रकरणी तात्काळ चौकशी करून तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने अधिसभा निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाचे चंद्रगुप्त भिडे यांनीही अधिसभा निवडणुकीच्या मतदारयादीतील त्रुटींबाबत मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. सुनील भिरुड यांना १ ऑगस्टला आणि राज्यपालांना २ ऑगस्टला पत्र पाठविले होते.

प्रभारी कुलसचिवांचे स्पष्टीकरण..

अधिसभा निवडणूक स्थगितीची माहिती अनेकांपर्यंत उशिरा पोहोचली. मात्र, त्याआधीच उमेदवारांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले होते. सरकारी कार्यालयात आवक – जावक विभागात कोणीही अर्ज, पत्र आणल्यास ते स्वीकारणे बंधनकारक आहे, असे प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. सुनील भिरुड यांनी स्पष्ट केले. 

विद्यापीठाचे स्पष्टीकरण

पदवीधर मतदारांची मोठी संख्या पाहता विसंगतीबाबत तात्काळ कार्यवाही करणे शक्य नाही. तसेच सखोल चौकशीसाठी विद्यापीठास वेळ आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठास योग्य ते मार्गदर्शन करण्याची विनंती शासनाकडे करण्यात आली होती. त्यादृष्टीने शासनाकडून आलेल्या पत्रानुसार मतदारयादीबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने कागदपत्रांची सखोल तपासणी केल्यानंतरच निवडणूक प्रक्रिया होणे आवश्यक आहे. मतदारयादी अद्ययावत करेपर्यंत निवडणूक पुढे ढकलण्याबाबत विद्यापीठाला निर्देश देण्यात आले. त्यानुसार १७ ऑगस्टच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठराव करण्यात आला आणि निवडणूक स्थगितीचे परिपत्रक जारी करण्यात आले, असे विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

‘मुख्यमंत्र्यांच्या भित्रेपणाचा परिणाम’ मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भित्रे आहेत. पक्ष फोडून, घर फोडून तसेच ‘महाशक्ती’बरोबर असतानाही कोणत्याही प्रकारच्या निवडणुका घेण्यास ते कचरत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीसही त्याच भीतीतून स्थगित देण्यात आली आहे, अशी टीका युवा सेनाप्रमुख आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. आदित्य यांनी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना पत्रही पाठवले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड्. अमोल मातेले  यांनीही राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठवले आहे.