लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : भावी नगरसेवकांच्या अधिकारावर गदा आणून दक्षिण मुंबईमधील मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील ऑपेरा हाऊस परिसरातील मॅथ्यू मार्गाचे श्रीमद राजचंद्र मार्ग असे नामकरण करण्याचा घाट घालण्यात आला असून त्याला गिरगावकरांकडून विरोध होऊ लागला आहे. दक्षिण मुंबईमधील अनेकांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला असून त्यापैकी एकाचे नाव या रस्त्याला द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. महानगपालिकेने या मागणीचा विचार केला नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यामुळे आता या नामकरणाचा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.
श्रीमद राजचंद्र मिशन धारमपूर संस्थेतर्फे १७ एप्रिल २०२३ रोजी स्थानिक आमदार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांना पत्राद्वारे ऑपेरा हाऊस परिसरातील रॉयल ऑपेरा हाऊसपासून भारत पेट्रोलियम पंपापर्यंतच्या मॅथ्यू मार्गाचे श्रीमद राजचंद्र मार्ग असे नामकरण करण्याची विनंती करण्यात आली आहे. या पत्राची दखल घेऊन लोढा यांनी याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाला विनंती पत्र पाठवून मॅथ्यू मार्गाच्या नामकरणासाठी पाठपुरावा केला. या नामकरणाला अनुकूलता दर्शवत ‘डी’ विभाग कार्यालयाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र या नामकरणाला गिरगावकरांनी कडाडून विरोध केला आहे.
आणखी वाचा-मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांवर फलाट तिकीट विक्री बंद
मुंबईमधील एखाद्या रस्त्याचे नामकरण अथवा नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडण्याचा अधिकार स्थानिक नगरसेवकांना असतो. परंतु मुंबई महानगरपालिका सभागृहाची मुदत संपुष्टात आल्यामुळे सध्या नगरसेवक पद अस्तित्वात नाही. असे असताना मंत्र्यांच्या विनंतीनुसार ‘डी’ विभाग कार्यालयाने नामकरणाचा प्रस्ताव तयार करून भावी नगरसेवकांच्या अधिकारावर गदा आणण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे तात्काळ हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी ‘गर्जतो मराठी’ चळवळीचे शशिकांत पवार, चेतन मदन आणि परेश तेलंग यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून केली आहे.
दक्षिण मुंबईत अनेक कलावंत, खेळाडू, कीर्तनकार घडले. गिरगाव आणि आसपासच्या परिसरातील अनेक रहिवाशांनी विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर, अभिनेत्री रिमा लागू, अभिनेते जयंत सावरकर, लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण, अभिनेते दाजी भाटवडेकर, प्रदीप पटवर्धन, शिवसेना नेते प्रमोद नवलकर, विलास अवचट, चंद्रकांत पडवळी आदी दिग्गज मंडळींचा त्यात समावेश आहे. मॅथ्यू मार्गाचे नाव बदलायचे असेल तर वरील व्यक्तींपैकी एकाचे नाव त्याला द्यावे, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. या पत्रावर अद्याप कोणताही विचार झालेला नाही. त्यामुळे आंदोलन करावे लागेल, असा इशारा पवार, मदन, तेलंग यांनी दिला आहे.