कडक शिस्तीने संपूर्ण पोलीस दलात दरारा निर्माण करणाऱ्या, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून नावलौकिक असणाऱ्या मीरा बोरवणकर यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची संधी येत्या बुधवारी पुणेकरांना मिळणार आहे. येत्या २० नोव्हेंबरला पुण्यात होणाऱ्या लोकसत्ता व्हिवा लाऊंज कार्यक्रमाच्या निमित्ताने ही संधी मिळणार आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांत धडाडीने काम करणाऱ्या यशस्वी स्त्रियांना व्हिवा लाऊंजमध्ये आमंत्रित करण्यात येते. या वेळी प्रथमच व्हिवा लाऊंज पुण्यात होणार आहे. त्यानिमित्त पुण्याच्या आयुक्तपदी धडाडीने काम केलेल्या मीरा बोरवणकर पुणेकरांशी थेट संवाद साधतील. मीरा बोरवणकर सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक, तुरुंग प्रशासन या पदावर कार्यरत आहेत. एक महिला पोलीस अधिकारी एवढीच त्यांची ओळख मर्यादित नाही, तर करारी, धीट आणि कोणत्याही दबावाला न जुमानता कारवाई करणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे.
पंजाबच्या छोटय़ा गावांतून एका करारी पोलीस अधिकाऱ्यापर्यंतचा त्यांचा प्रवास व्हिवा लाऊंज या कार्यक्रमातून उलगडणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश मिळेल.
कधी : २० नोव्हेंबर.
कुठे : एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे.
वेळ : दुपारी ३.३०वाजता.

Story img Loader