कडक शिस्तीने संपूर्ण पोलीस दलात दरारा निर्माण करणाऱ्या, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून नावलौकिक असणाऱ्या मीरा बोरवणकर यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची संधी येत्या बुधवारी पुणेकरांना मिळणार आहे. येत्या २० नोव्हेंबरला पुण्यात होणाऱ्या लोकसत्ता व्हिवा लाऊंज कार्यक्रमाच्या निमित्ताने ही संधी मिळणार आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांत धडाडीने काम करणाऱ्या यशस्वी स्त्रियांना व्हिवा लाऊंजमध्ये आमंत्रित करण्यात येते. या वेळी प्रथमच व्हिवा लाऊंज पुण्यात होणार आहे. त्यानिमित्त पुण्याच्या आयुक्तपदी धडाडीने काम केलेल्या मीरा बोरवणकर पुणेकरांशी थेट संवाद साधतील. मीरा बोरवणकर सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक, तुरुंग प्रशासन या पदावर कार्यरत आहेत. एक महिला पोलीस अधिकारी एवढीच त्यांची ओळख मर्यादित नाही, तर करारी, धीट आणि कोणत्याही दबावाला न जुमानता कारवाई करणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण होऊन त्या १९८१ मध्ये सेवेत रुजू झाल्या. मीरा बोरवणकर हे नाव खऱ्या प्रकाशझोतात आले त्या मुंबईच्या माटुंगा विभागाच्या उपायुक्त बनल्या तेव्हा. १९८७ ते ९१ ही चार वर्षांची त्यांची कारकीर्द विशेष गाजली. त्या वेळी माटुंगा परिसरात वरदराजन मुदलीयार या गुंडाचे वर्चस्व होते. मात्र कडक शिस्तीच्या बोरवणकर यांनी कुठल्याही दबावाला न जुमानाता समाजकंटकांविरुद्ध जोरदार कारवाई केली. त्यानंतर औरंगाबादच्या अधीक्षक म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटविला. जळगाव वासनाकांडाच्या तपासाच्या वेळी राज्य गुप्तचर विभागाच्या उपायुक्त म्हणून त्यांची कसोटी लागली. त्यानंतर त्या केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त झाल्या. पुढे दिल्ली येथे केंद्रीय गुप्तचर विभागाच्या उपमहानिरीक्षक आणि महानिरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर त्या थेट मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहआयुक्त बनल्या. मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पहिल्या महिला सहआयुक्त होण्याचा मान त्यांना मिळाला. तीन वर्षांची कार्यक्षम कारकीर्द भूषविणाऱ्या बोरवणकर यांची बदली राज्य गुप्तचर विभागाच्या महानिरीक्षक म्हणून पुण्यात झाली. त्यानंतर वर्षभरातच त्या पुण्याच्या पोलीस आयुक्त बनल्या. पुण्याच्या पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी अनेक उपक्रम राबविले. पुण्याच्या डिस्को आणि पब संस्कृतीविरुद्ध जोरदार कारवाई केली. एक कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे.
पंजाबच्या छोटय़ा गावांतून एका करारी पोलीस अधिकाऱ्यापर्यंतचा त्यांचा प्रवास व्हिवा लाऊंज या कार्यक्रमातून उलगडणार आहे. हा कार्यक्रम २० नोव्हेंबर रोजी एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे दुपारी साडेतीन वाजता होईल. कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश मिळेल.
कधी : २० नोव्हेंबर.
कुठे : एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे.
वेळ : दुपारी ३.३०वाजता.
मीरा बोरवणकर यांच्याशी व्हिवा लाऊंजमध्ये संवाद
कडक शिस्तीने संपूर्ण पोलीस दलात दरारा निर्माण करणाऱ्या, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून नावलौकिक असणाऱ्या मीरा
First published on: 16-11-2013 at 03:48 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conversation with meera borwankar in viva lounge at pune