मुंबई : विधानसभा निवडणुकीतील कौल धुडकावून उद्धव ठाकरे यांनी धोका दिल्याने तर, एकत्र येण्याचा प्रस्ताव स्वत:च देऊनही वेळकाढूपणा करणाऱ्या शरद पवार यांनी भाजपशी लबाडी केल्याने या दोघांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशावरूनच धडा शिकवला, असे परखड प्रतिपादन मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अ‍ॅड्. आशीष शेलार यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात गुरुवारी केले. अजित पवार महायुतीमध्ये सहभागी होण्यासही उद्धव ठाकरे हेच जबाबदार असल्याचा दावाही शेलार यांनी केला. 

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, लोकसभा निवडणुकीतील तिकीटवाटप, मुंबईसह राज्यातील राजकीय परिस्थिती आदी अनेक मुद्दयांवर शेलार यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात मनमोकळेपणे विवेचन केले. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीविषयी शेलार म्हणाले, आम्ही २०१९ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती म्हणून मते मागितली होती. तरीही निवडणुकीनंतर ठाकरे यांनी दगाबाजी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केले. ठाकरे हे २०१४-१९ या काळात सत्तेत असतानाही कायम अनेक मुद्दयांवर विरोधी भूमिका घेत होते.  शरद पवार यांनी २०१४ मध्ये पाठिंबा मागितला नसताना भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता. वास्तविक भाजपबरोबर येण्याचा प्रस्ताव शरद पवार यांनी २०१७ मध्ये दिला होता. त्यानंतर पवारांनी वारंवार एकत्र येऊ, असे कळविले होते. पण पवारांनी मुद्दामहून वेळकाढूपणा केला. ठाकरे आणि पवार यांच्या या भूमिकांमुळे त्यांना अद्दल घडविण्याची गरज असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भूमिका होती. त्यानुसार त्यांना धडा शिकवण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले.

Raj Thackeray
Raj Thackeray in Nashik : “निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो…”, प्रचारसभांना कंटाळून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sillod assembly constituency uddhav thackeray campaign for suresh bankar maharashtra assembly elections 2024
ठाकरेंची सत्तारांविरोधात भाजपला साद मतभेद असतील तर बोलू; पण आधी सिल्लोडमध्ये पराभव करण्याचे आवाहन
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Sharad Pawar and Raj Thackeray meeting in Khadakwasla and Hadapsar Constituency
हडपसर, खडकवासला मतदारसंघात पवार ठाकरेंच्या तोफा धडाडणार, एकमेकांना काय उत्तर देणार !
uddhav Thackeray sawantwadi
“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा
maharashtra assembly election 2024 there is no election campaign tour of aditya thackeray in thane district
ठाणे जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचा प्रचार दौराच नाही

हेही वाचा >>> दारूडा आणि नरेंद्र मोदींची वृत्ती एकच, प्रकाश आंबेडकर यांची टीका

शिवसेना त्रास देत असल्याने २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेण्याविषयी चर्चा झाली, तेव्हा आम्ही युतीधर्म पाळून तीन पक्षांच्या सरकारचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र शरद पवार यांनी शिवसेनेला बरोबर ठेवण्यास तीव्र विरोध केला होता आणि त्यांनी २०१९ मध्ये मात्र ठाकरे यांच्याबरोबर सरकार स्थापन केले याकडेही शेलार यांनी लक्ष वेधले.

भाजप-शिवसेना युतीने २०१९ मध्ये व त्याआधीही अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराविरोधात रान उठविले होते आणि जनतेकडून मते मागितली होती. त्यानंतर मात्र शिंदे-फडणवीस सरकार स्थिर असतानाही अजित पवार यांचा समावेश सत्तेत का करण्यात आला आणि ती मतदारांशी प्रतारणा होत नाही का, असे विचारता शेलार म्हणाले, ‘पवार यांच्या सत्तेत समावेशासाठीही ठाकरेच जबाबदार आहेत. त्यांनी २०१९ मध्ये वेगळा विचार किंवा भूमिका घेतली नसती, तर ही वेळच आली नसती.’

शिवसेनेच्या जिवावर भाजप मोठा नाही

महाराष्ट्रात शिवसेनेमुळे भाजप वाढला, असा ठाकरेंसह अनेक शिवसेना नेत्यांचा दावा शेलार यांनी फेटाळून लावला. ‘भाजप शिवसेनेच्या जोरावर मोठा झालेला नाही. दोघेही एकमेकांना पूरक असून दोघांनाही एकमेकांचा उपयोग झाला आहे. भाजप हा मोठा भाऊ आहे. मोठया भावाला अनेकदा समजूतदारपणा दाखवावा लागतो. तसा तो अनेकदा दाखविण्यातही आला,’ असे ते म्हणाले. भाजपने ‘शत प्रतिशत’ ची भूमिका मांडली, तर छोटे पक्ष भाजपला संपवायचे आहेत आणि हुकूमशाही वृत्ती असल्याचा आरोप विरोधकांकडून होतो. पण प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही आजही ‘ शत प्रतिशत भाजप ’ भूमिकेवर ठाम आहोत, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.