मुंबई : शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर पॅरोलवर (अभिवचन) बाहेर आलेला शिक्षाबंदी नरेंद्र गिरी कारागृहात परतला नव्हता. अखेर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अरुण गवळीसह इतर ११ आरोपींना सत्र न्यायालयालयाने जन्मठेप शिक्षा सुनावली होती. याप्रकरणातील शिक्षाबंदी नरेंद्र गिरी (३९) कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.
हेही वाचा >>> विक्रोळीत बलात्कार पीडित महिलेची आत्महत्या
कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून त्याला पॅरोलवर मुक्त करण्यात आले होते. पॅरोल संपल्यानंतर त्याने ३१ जानेवारी २०२४ रोजी कोल्हापूर कारागृहात हजर होणे अपेक्षित होते. पण तो कारागृहात हजर झाला नाही. त्यामुळे कोल्हापूर कारागृहाने याप्रकरणी तक्रार केली होती. याप्रकरणी नवी मुंबईतील तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या कक्ष-३ कडून करण्यात येत होता. गिरी परराज्यात पळून गेला होता. तसेच तो आपले ठिकाण वारंवार बदलत होता. त्याच्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष ठेवण्यात आले होते. तो नवी मुंबईतील घणसोली येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शिताफीने गिरीला बुधवारी अटक केली. आरोपी यापूर्वी गवळी टोळीसाठी काम करत होता.