पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांची प्रतीक्षा असतानाच ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते पनवेलदरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित लोकललाही थंड प्रतिसाद मिळत आहे. ट्रान्स हार्बवरील वातानुकूलित लोकलच्या दिवसाला होणाऱ्या १६ फेऱ्यांमधील प्रत्येक फेरीतून केवळ ८० ते ९० प्रवाशांचाच प्रवास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. एका लोकलची प्रवासी क्षमता पाच हजारांपेक्षा जास्त असतानाही वातानुकूलित लोकलला मिळणारा प्रतिसाद हा केवळ दोन टक्यांपर्यंतच आहे.
३० जानेवारीला पनवेल ते ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल गाडीला रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवण्यात आला. वातानुकूलित लोकल ३१ जानेवारीपासून नियमितपणे सेवेत येताना सामान्य लोकलच्या १६ फेऱ्या रद्द केल्या. त्यामुळे सामान्य लोकलच्या प्रवाशांनी एकच गर्दी या लोकल गाडीला केली आणि मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर वातानुकूलितमधून सामान्य लोकलमधील प्रवाशांना प्रवासास मज्जाव करण्यासाठी तिकीट तपासणीस, रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी तैनात केले. अवाच्या सवा तिकीट दर, सामान्य लोकलच्या रद्द केलेल्या फेऱ्या यामुळे वातानुकूलित लोकलकडे मोठय़ा संख्येने प्रवासी फिरकले नाहीत.
सामान्य लोकलची प्रवासीक्षमता ५ हजारांपेक्षा जास्त असतानाही ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकलच्या १६ फेऱ्यांमधून सरासरी १,३०० ते १,४०० प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रत्येक फेरीतून अवघे ८० ते ९० प्रवासीच प्रवास करत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ३० जानेवारीला ९७ तिकिटांची विक्री होताना २९६ प्रवाशांनी प्रवास केला होता. तर ३१ जानेवारीला २०९ तिकिटांची विक्री आणि १ हजार ३०४ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे. यात वाढ होत गेली. ५ जानेवारीला प्रवासी संख्येत वाढ असून सर्वाधिक १ हजार ४९६ प्रवाशांनी प्रवास केला आहे. ४ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारीत मिळालेल्या प्रतिसादामुळे १ लाख ६७ हजार ८०१ रुपये महसूलही मिळाल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. परंतु प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद केवळ दोन टक्केच आहे.
प. रे वरही तीच गत : प.रेल्वेवर सुरू असलेल्या वातानुकूलित लोकल फेरीला दोन वर्षे उलटूनही प्रतिसाद कमी आहे. या लोकलच्या दिवसाला १२ फेऱ्या होतात. आतापर्यंत ९५ लाख ८१ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांनी वातानुकूलित लोकलमधून प्रवास केला आहे. १२ फेऱ्यांमधून एकूण १८ हजार प्रवासी प्रवास करत असून एका फेरीतून सरासरी दीड हजार प्रवाशांचा प्रवास होतो.
विनातिकीट प्रवाशांची घुसखोरी : ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवासीही घुसखोरी करत आहे. सामान्य लोकलचे तिकीट घेऊन लोकलमधून प्रवास, तिकीटच न काढलेले प्रवासी आढळत आहेत. ६ फेब्रुवारीला तिकीट तपासणीसांनी केलेल्या कारवाईत ३० विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकूण ११ हजार ५६५ रुपये दंड वसूल केला आहे.