मुंबई: परळच्या दामोदर नाट्यगृहाच्या पुर्नविकासाला सहकारी मनोरंजन मंडळाने विरोध केला असून या संस्थेने आता पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे धाव घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता पालिका प्रशासनाने हस्तक्षेप घेतला असून विकास नियोजन विभागाने या नाट्यगृहाच्या जमिनीच्या आरक्षण बदलाला स्थगिती दिली आहे. तसेच या विषयावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी पालकमंत्र्यांकडे बैठक होणार आहे.
परळ येथे ना म जोशी संकुलातील दामोदर नाट्यगृह पाडून त्या जमिनीचा पुनर्विकास करण्याचे प्रयत्न असून त्याला रंगकर्मींनी यापूर्वीच विरोध केला होता. मात्र तरीही सोशल सर्व्हीस लीगने या जागेचा पुर्नविकास करण्याचे ठरवले आहे. सहकारी मनोरंजन मंडळाने या पुनर्विकासाला विरोध केला आहे. याप्रकरणी हस्तक्षेप करण्यासाठी मंडळाने आता पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना साकडे घातले आहे. ना. म. जोशी संकुलात नाट्यगृह, शाळा, मोकळे मैदान अशी वेगवेगळी आरक्षण आहेत. ही जागा महापालिकेच्या मालकीची असून बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या (बीआयटी) माध्यमातून सोशल सर्व्हिस लीग या संस्थेला भाडे कराराने दिली होती. दामोदर हॉलच्या जागेवर नाट्यगृहाचे आरक्षण आहे. नाट्यगृहाचा पुनर्विकास करण्याचा नावाखाली दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय पाडून त्या जागेवर सीबीएसई शाळेची इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी विकास आरखड्यातील नाट्यगृहाचे आरक्षण काढून शाळेचे आरक्षण टाकण्यात आल्याचा आरोप मंडळाने पालकमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या जागेवर ५५० खुर्च्यांचे सभागृह तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात हे सभागृह होईल याची शाश्वती नाही, त्यामुळे नाट्यगृहाच्या जागी नाटयगृहच झाले पाहिजे अशी मागणी मंडळाने केली आहे. या प्रकरणी आता आरक्षण बदलाला विकास नियोजन विभागाने स्थगिती दिली असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. तसेच या विषयावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एका संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>“मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, महिला वर्गाला विनंती आहे की…”, अजित पवारांचं महत्त्वाचं आवाहन
सन १९२२ मध्ये ना म जोशी यांनी स्थापन केलेल्या दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळाने २०२२ मध्ये शंभर वर्षे पूर्ण केली. भालजी पेंढारकर, राम मराठे, विद्याधर गोखले हे या मंडळात सक्रीय होते. अनेक नामवंत रंगकर्मींनी या मंडळाच्या संगीत नाटकांमधून रंगभूमीची सेवा केली. नवीन पिढीचे अनेक कलाकारही याच दामोदर नाट्यगृहाच्या रंगमंचावर घडले. मात्र सोशल सर्व्हीस लीगने ऐन दिवाळीत दोन महिन्यांचा पगार देऊन नाट्यगृह कर्मचाऱ्यांना कायमचे घरी बसवले. मात्र त्यात नाट्यगृहाच्या द्वारपालांना पगारही दिला नाही, असा आरोप सहकारी मनोरंजन मंडळाने केला आहे. नवीन नाट्यगृह कुठे व कधी सुरू होणार, मंडळाला जागा कुठे व कधी देणार, नाट्यगृह पडल्यानंतर नाटक कुठे होणार, तालमी कुठे करायच्या याबाबत कोणतेही उत्तर संस्थेने दिलेले नाही. त्यामुळे मंडळाने अखेर पालिकेकडे धाव घेतली आहे. पुर्नविकासाला विरोध नाही पण पुनर्विकासाच्या नावाखाली गिरणगावातील ८०० खुर्च्यांचे नाट्यगृह अप्रत्यक्षपणे बंद करण्याला विरोध असल्याचे संस्थेने आपल्या पत्रात म्हटले आहे. नाट्यगृहाच्या जागी नाट्यगृहच व्हावे व त्यात सहकारी मनोरंजन मंडळाला जागा मिळावी अशी मागणीही मंडळाने केली आहे.