एका महिला पोलीस काँन्सटेबलसोबत प्रेमसंबंध ठेवून दुसऱ्या महिला पोलीस काँन्सटेबलसोबत लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास कळवा पोलिसांनी सोमवारी भिवंडी येथील लग्न मंडपातून अटक केली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सचिन भास्कर पाटील (२५, रा. भिवंडी), असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो नवीमुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. ठाणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला काँन्सटेबलसोबत त्याचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पोलीस प्रशिक्षण केंद्रात झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी अधिक जवळीक वाढवली होती.
दरम्यान, बहिणीचे लग्न असल्याने तीन ते चार दिवस फोन करू नकोस, असे त्याने तिला सांगितले होते. मात्र, त्याच्या बहिणीचे नव्हे तर त्याचे लग्न असल्याची माहिती तिला मिळाली होती. त्यामुळे तिने थेट कळवा पोलीस ठाणे गाठले आणि या प्रकरणाची तक्रार दिली. पोलिसांनी त्यानुसार या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करून त्याला सोमवारी सकाळी भिवंडी येथील लग्न मंडपातून अटक केली. ज्या मुलीसोबत त्याचे लग्न होणार होते, ती सुद्धा पोलीस काँन्सटेबल असून ठाणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे.
लग्नाआधीच हा प्रकार उघडकीस आल्याने तिने सुद्घा या प्रकरणी त्याच्याविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cop arrested in marriage fraud case
Show comments