शनिवारपासून बेपत्ता असलेले अपंग पोलीस निरीक्षक सुरेश सोनावणे दोन दिवसांनंतर सोमवारी सापडले. मात्र त्यांनी जे सांगितले ते ऐकून सर्वाच्याच अंगावर शहारे आले. सोनावणे हे बेपत्ता झाले नव्हते, तर आपल्या कार्यालयामधील इमारतीत शनिवारपासून अडकून पडले होते. सुटकेसाठी सोनावणे दीड दिवस असहायपणे धडपड करीत होते. क्रॉफर्ड मार्केटच्या शिवाजी मंडईमधील लिफ्टमध्ये ते शनिवारी दुपारपासून अडकले होते.
  क्रॉफर्ड मार्केटजवळील छत्रपती शिवाजी मंडई या पालिकेच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर गुन्हे प्रतिबंधक शाखेचे कार्यालय आहे. या कार्यालयातील हरवलेल्या व्यक्तींच्या शोधकेंद्रात सुरेश सोनावणे (४६) हे पोलीस निरीक्षक कार्यरत आहेत. शनिवार, १३ एप्रिलपासून ते घरी परतले नव्हते. ते बेपत्ता असल्याची तक्रार रविवारी त्यांच्या पत्नीने माता रमाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात दिली होती. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सोनावणे सापडले ते कार्यालयीन इमारतीच्या लिफ्टमध्येच.
शनिवारी १३ एप्रिल रोजी दुपारी सोनावणे जेवणासाठी कार्यालयातून बाहेर पडले होते. लिफ्टमधून खाली येत असताना दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याच्या मध्ये लिफ्ट अचानक बंद पडली. वास्तविक त्या वेळेला लिफ्ट दुरुस्त करणारे कर्मचारी आले होते. त्यांनी खातरजमा न करता लिफ्टचा वीजपुरवठा बंद केला आणि लिफ्टमध्ये असलेले सोनावणे अडकले. दुसरा शनिवार असल्याने या इमारतीमधील बहुतांश खाजगी कार्यालये बंद होती. त्यामुळे सोनावणे यांच्या मदतीला कुणी आले नाही. याप्रकरणी सोनावणे लिफ्टमध्ये कसे अडकले आणि कर्मचारी त्यासाठी जबाबदार आहेत का, त्याची चौकशी सुरू असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश (दक्षिण प्रादेशिक) यांनी सांगितले. दीड दिवस लिफ्टमध्ये अडकलेल्या सोनावणे यांना सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सोनावणे हे शारीरिकदृष्टय़ा अपंग आहेत. सात वर्षांपूर्वी त्यांना ब्रेनहॅमरेज झाला होता. त्यांना नीट चालता येत नव्हते. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रियाही झाली होती. त्यामुळे त्यांना मोबाइल वापरण्यास डॉक्टरांनी मनाई केली होती. त्यामुळेच त्यांना नाइलाजाने लिफ्टमध्ये अडकून राहावे लागले होते. सोमवारी आम्ही त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तब्येत बिघडल्याने सोनावणे यांची चौकशी करता आली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर जुईकर यांनी सांगितले.

Story img Loader