ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रदिप इंदूलकर यांची तक्रार ऐकून न घेताच त्यांना मारहाण करणारे नौपाडय़ातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) आर. एस. शिरतोडे यांना आता सर्वसामान्य ठाणेकरांच्या तक्रारी ऐकण्यासाठी ठाणे नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणात ठाणे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी शिरतोडे यांची केवळ बदली करून त्यांच्या अपराधांवर पांघरूण घातल्याचे दिसून येत असल्याने ठाण्यातील सामाजिक वर्तुळात आता तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दहींहडी उत्सावात डिजेंच्या घणघणाटाने ध्वनी प्रदुषण करणाऱ्या मंडळांविरोधात इंदूलकर यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र, त्यावेळी त्यांची तक्रार घेण्यात आली नव्हती. दुसऱ्या दिवशी नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन इंदूलकर यांनी तक्रारीवर काय कारवाई केली, याविषयी विचारणा केली होती. त्यामुळे संतापलेल्या पोलीस निरीक्षक शिरतोडे यांनी इंदूलकर यांना मारहाण केली होती. पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त रघुवंशी यांनी दिले होते. त्यानुसार, दुधे यांनी बुधवारी अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार, गुरूवारी शिरतोडे यांची बदली केली. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे.डी. मोरे यांना मात्र या प्रकरणात क्लिन चिट देण्यात आली आहे.
यामुळे ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणखीनच अस्वस्थ झाले असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सर्वसामान्य ठाणेकर आपल्या तक्रारी नियंत्रण कक्षाला कळवित असतात. पण, त्याच ठिकाणी शिरतोडे यांच्यासारख्या अधिकाऱ्याला नागरीकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी बसविण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ठाणेकरांना कितपत न्याय मिळेल, ही शंकाच आहे, अशी प्रतिक्रिया इंदूलकर यांनी दिली.  या संदर्भात आयुक्त रघुवंशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.