‘नक्कल’ करून परिवर्तने घडत नाहीत. नक्कलांच्या प्रतिक्रियांमध्ये केवळ वीज चमकते, नंतर नुसता अंधार असतो. आणीबाणीच्या काळानंतर समाजाने हे अनुभवले आहे. लोकशाहीत शेवटी समाज हाच बाप असतो, या शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून त्यांना टोला हाणला.
 संघाचा मकरसंक्रमण उत्सव डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात आयोजित केला होता.
देशात समृध्दी आणि जगात शांतता हवी असेल तर प्रत्येक घराघरात रूजलेला प्राचीन भारतीय मूल्य विचार जागृत होणे आवश्यक आहे. जगातील विचारवंत भारताकडून अशाप्रकारच्या स्थायी परिवर्तनाची वाट पाहत आहेत, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.एका तासाच्या भाषणात भागवत यांनी नरेंद्र मोदींचा नामोल्लेख टाळला. मात्र, देशातील अनाचारी परिस्थिती, समाजिक उदासीनता बदलण्यासाठी ‘परिवर्तन’ आवश्यक आहे, असे सांगितले.
पोकळ नेतेपणा टिकवून ठेवण्यासाठी काही ‘वाघ’ मेंढय़ांच्या कळपात धक्के खात जीवन जगताना दिसत आहेत, असा राजकीय उपहासही त्यांनी व्यक्त केला. अशा दुटप्पी नेतेगिरीचा भागवत यांनी समाचार घेतला.