शैलजा तिवले, लोकसत्ता
मुंबई : १२ ते १४ वयोगटातील बालकांसाठी उपलब्ध केलेल्या कोर्बेव्हॅक्स लशीच्या कुपीमध्ये २० मात्रा आहेत. मात्र त्या तुलनेत लसीकरणाला प्रतिसाद कमी आहे. त्यामुळे लशींच्या मात्रा वाया जाण्याची शक्यता आहे.
बालकांचे लसीकरण १६ मार्चपासून सुरू झाले असले तरी रविवारपर्यत लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत होता. प्रायोगिक तत्त्वावर पालिकेने शहरातील १२ केंद्रांवरच लसीकरण सुरू केले होते. परंतु लसीकरणासाठी पालक फारसा पुढाकार घेत नसल्याने सोमवारपासून पालिकेने सर्व केंद्रांवर या बालकांचे लसीकरण सुरू केले. परिणामी लसीकरणाचे प्रमाण वाढले असून एका दिवसात सुमारे दीड हजारांहून अधिक बालकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे.
मुंबईत एकूण सुमारे ८ हजार ९७२ बालकांचे लसीकरण झाले आहे. एकीकडे लसीकरण वाढले असले तरी एकूणच प्रतिसाद कमी असल्यामुळे आणि बालके वेगवेगळय़ा केंद्रांवर विखुरली जात असल्यामुळे लशींच्या मात्रा वाया जाण्याची शक्यता आहे.
१२ ते १४ वयोगटासाठी कोर्बेव्हॅक्स ही लस दिली जात आहे. या लशीच्या एका कुपीमध्ये २० मात्रा आहेत. त्यामुळे एका केंद्रावर तेवढी बालके न आल्यास कुपी फोडल्यावर उर्वरित मात्रा वाया जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पालिकेने मोजक्याच केंद्रावर सुरुवातीला लसीकरण सुरू केले होते. परंतु केंद्राची संख्या कमी असल्यामुळे बालकांना दूरच्या केंद्रावर नेण्यास पालक फारसे तयार नसल्याचे आढळले. त्यामुळे अखेर पालिकेने सर्व केंद्रावर लसीकरण सुरू केले.
लसीकरणाच्या पहिल्या दिवशी बहुतांश केंद्रावर दहापेक्षाही कमी बालके आली. काही केंद्रांवर तर दोन ते तीन बालकेच आली होती. परंतु पहिलाच दिवस असल्यामुळे या बालकांना परत पाठविणेही योग्य नसल्यामुळे कुपी फोडणे गरजेचे होते. त्यामुळे पाचपेक्षाही कमी मात्रांचा वापर झाला आणि अन्य मात्रा वाया गेल्या, असे दक्षिण मुंबईतील लसीकरण केंद्रावरील डॉक्टरांनी सांगितले. पहिले तीन दिवस बालकांचा प्रतिसाद फार कमी असल्यामुळे अधिक प्रमाणात मात्रा वाया गेल्या. परंतु सोमवारपासून बालकांचे प्रमाण थोडे वाढल्यामुळे मात्रा वाया जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असे लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
बालकांची प्रतीक्षा
छोटय़ा केंद्रावर अजूनही लसीकरणासाठी फारसा प्रतिसाद मिळत नाही. दुपारनंतर तर प्रतिसाद काही प्रमाणात कमी होतो. त्यामुळे दुपारनंतर एका कुपीचा (एकूण २० मात्रा) पूर्ण वापर होतोच असे नाही. अशा वेळी बालकांची थोडा वेळ वाट पाहून कुपी फोडली जाते. जेणेकरून जास्तीत जास्त वापर केला जाईल, असे लसीकरण केंद्रावरील डॉक्टरांनी सांगितले.
सध्या परीक्षांचा काळ असल्याने बालकांच्या लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत आहे. यामुळे सुरुवातीला काही मात्रा निश्चितच वाया जातील. परंतु याचा फार विचार न करता लसीकरण वेगाने पूर्ण करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. लसीकरणाने वेग घेतल्यानंतर लस वाया जाण्याचे प्रमाण कमी होईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
‘एका कुपीमध्ये दहा मात्रा असाव्यात’
करोना प्रतिबंधात्मक इतर लशींप्रमाणे या लशीच्या एका कुपीत दहा मात्रा असल्यास त्या वाया जाण्याचे प्रमाण कमी होईल. कंपनीने या पद्धतीने पुढील कुप्यांची रचना केल्यास अधिकाधिक योग्यरितीने वापर केला जाईल, असे मत पालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
खासगी रुग्णालयांचा पर्याय बंद
खासगी रुग्णालयातील लसीकरणाचा अल्प प्रतिसाद आणि अनेक लशी मुदतबाह्य झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालये बालकांच्या लसीकरणामध्ये सहभागीच झालेले नाहीत. त्यामुळे या बालकांच्या लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांचा पर्यायच उपलब्ध नाही.