गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. मागील महिनाभरात करोना रुग्णांच्या संख्येत तब्बल पाच हजारांने घट झाली आहे. राज्यामध्ये १४ ते २० एप्रिलदरम्यान सहा हजार १२९, तर ५ ते ११ मेदरम्यान एक हजार २१० रुग्णांची नोंद झाली आहे. या आकडेवारीवरून करोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा >>> मुंबई: १८ गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी अटकेत; आरोपीकडून हत्यार जप्त
जागतिक आरोग्य संघटनेने करोना आणिबाणी संपुष्टात आल्याचे जाहीर केले असले तरी राज्य सरकारने करोनाविरोधातील आपला लढा सुरूच ठेवला आहे. पूर्वीप्रमाणेच अधिकाधिक चाचण्या करण्यावर, तसेच रुग्णांचा पाठपुरावा, विलगीकरण, लसीकरण आणि योग्य उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. १४ एप्रिल ते ११ मे या कालावधीत राज्यातील रुग्णसंख्या तब्बल चार हजार ९१९ ने कमी झाली. १४ ते २० एप्रिलदरम्यान राज्यामध्ये सहा हजार १२९ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतरच्या २१ ते २७ एप्रिलदरम्यान करोना रुग्णांची संख्या चार हजार ८७४ इतकी नोंदविण्यात आली. म्हणजेच या कालावधीत रुग्णसंख्येत १,२५५ ने घट झाली. त्यापुढील आठवड्यात (२८ एप्रिल ते ४ मे) करोना रुग्णसंख्या दोन हजार ४८७ इतकी नोंदवली गेली. म्हणजेच मागील आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत तब्बल दोन हजार ३८७ ने घट झाली. तर ५ ते ११ मे या कालावधीत रुग्णसंख्या एक हजार २१० इतकी नोंदवली गेली आहे. १४ ते २० एप्रिलच्या तुलनेत रुग्णसंख्येत तब्बल चार हजार ९१९ ने घट झाली आहे.
हेही वाचा >>> मुंबई : सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर; गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात साडेपाच टक्क्यांची घट
लसीकरण आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली प्रतिपिंडे यामुळे करोनाचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. नागरिकांच्या शरीरात निर्माण झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे करोनाचा फारसा प्रसार झालेला नाही. तसेच गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. यापुढेही करोना अधूनमधून डोके वर काढण्याची शक्यता आहे. मात्र नागरिकांच्या शरीरात निर्माण झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे त्याचा सामना करणे शक्य होणार असल्याची माहिती इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी दिली.
फेब्रुवारीच्या मध्यापासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. मात्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे करोनाचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. लसीकरणामुळे करोनाची तीव्रता कमी झाल्याने रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी होते. लसीकरणामुळे करोना रुग्णसंख्या आटोक्यात आणणे शक्य झाल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.