देशात करोना लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून देशाच्या आणि महाराष्ट्राच्याही अनेक भागांमध्ये अनेक नागरिक करोना संपल्याच्याच आविर्भावात वावरत असल्याचं दिसून आलं आहे. असंच काहीसं चित्र मुंबईत देखील पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत करोनासंदर्भातली बदलती आकडेवारी डोळ्यांसमोर ठेवणं आवश्यक आहे. एकीकडे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये करोनाबाधित वाढू लागल्यामुळे पुन्हा काही निर्बंध घालावे लागले असताना मुंबईत देखील पुन्हा निर्बंध घालण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. गेल्या २४ तासांतली मुंबईतली आकडेवारी पाहिल्यास राज्य सरकार पुन्हा निर्बंधांचा विचार का करत आहे, याची प्रचिती येऊ शकते.
मुंबई महानगर पालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईचा डबलिंग रेट आता २३८ दिवसांवर गेला आहे. अर्थात आज असलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी २३८ दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र, त्याचवेळी मुंबईतल्या एकूण करोनाबाधितांची संख्या देखील वाढत आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार मुंबईत २४ तासांत ११०३ नवे करोनाबाधित सापडले आहेत. एकूण करोनाबाधितांचा आकडा ३ लाख २९ हजार ८४३ झाला आहे. त्यासोबतच २४ तासांत मुंबईत करोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ११ हजार ४८७ झाला आहे. तर ६५४ बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
#CoronavirusUpdates
4-Mar, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/51skXFRR5v— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 4, 2021
मुंबईत आजघडीला एकूण १४ कंटेनमेंट झोन आहेत जिथे मोठ्या संख्येने करोनाबाधित सापडले आहेत. तसेच, या झोनमधल्या एकूण १८५ इमारती सील करण्यात आल्या आहेत.मुंबईतल्या रिकव्हरी रेटबाबत दिलासादायक चित्र आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९३ टक्क्यांवर आहे. वेळीच होणाऱ्या करोना चाचण्यांमुळे तो वाढता ठेवण्यात यश आलं असून आत्तापर्यंत मुंबईत ३३ लाख ५३ हजार १२४ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.