|| इंद्रायणी नार्वेकर
१५७ पैकी ११ अर्ज मंजूर; मुंबई महापालिकेकडून भरपाई मिळणार
मुंबई : पालिकेच्या विविध विभागांतील तब्बल १५७ कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत भरपाईसाठी अर्ज केले होते. त्यापैकी केवळ ११ अर्ज मंजूर झाले असून ७७ अर्ज नाकारण्यात आले आहेत. त्यांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी पालिकेने आता प्रक्रिया सुरू केली आहे.
पालिकेच्या विविध विभागांतील तब्बल तीन हजारांहून अधिक कर्मचारी आतापर्यंत करोनाबाधित झाले आहेत, तर १५७ कर्मचाऱ्यांचा करोनाने बळी घेतला आहे. मात्र त्यापैकी केवळ १५ कर्मचाऱ्यांच्याच कुटुंबीयांना आतापर्यंत प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळू शकली आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत करोनाशी सामना करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा काढण्यात आला आहे. त्याअंतर्गत भरपाईसाठी पालिकेने कर्मचाऱ्यांसाठी अर्ज केले असता केवळ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचेच अर्ज विमा कंपनीने मंजूर केले आहेत. तर याशिवाय करोनाच्या रुग्णांच्या निकट संपर्कांचा शोध घेणे, घरांचे सर्वेक्षण करणे, प्रतिबंधात्मक कामे करणारे, चाचणी, उपचार व मदतकार्ये या पद्धतीचे काम करणाऱ्या महापालिकेतील विविध प्रवर्गांतील कामगार/ कर्मचारी आणि कंत्राटी कामगार यांचा कर्तव्य बजावताना करोनाने मृत्यू झाल्यास त्यांच्यासाठी पालिकेने आपली सानुग्रह अनुदान योजना सुरू केली असून त्यातही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये भरपाई दिली जाणार आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत केवळ पाच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ही भरपाई मिळाली आहे. त्यामुळे आतापर्यंत केंद्र सरकारकडून आणि पालिकेकडून अशा केवळ १५ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई मिळू शकली आहे. करोनामुळे मृत पावलेल्या पालिकेच्या एकूण १५७ कर्मचाऱ्यांपैकी ३२ कर्मचारी हे आरोग्य विभागातील आहेत. बाकीचे कर्मचारी हे पालिकेच्या अन्य विभागांतील आहेत. त्यापैकी केंद्र सरकारने केवळ आरोग्य विभागातील आणि प्रत्यक्ष करोना विभागात काम करणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांचे अर्ज मंजूर केले आहेत, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
आरोग्य विभागातील जे कर्मचारी थेट करोना विभागात काम करीत आहेत, अशाच कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने भरपाई दिली असून अन्य विभागांत काम करणाऱ्या ७७ कर्मचाऱ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. मात्र अन्य विभागांतील कर्मचारीही करोनाशी संबंधित काम करीत असल्यामुळे पालिकेने त्यांना भरपाई देण्याचे ठरवले आहे. मात्र कामगार, कर्मचारी हे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी किंवा मृत्यूच्या दिनांकापूर्वी १४ दिवसांच्या कालावधीमध्ये कर्तव्यावर हजर असावा, अशी अट घालण्यात आली आहे.
४२ कर्मचाऱ्यांचे अर्ज लेखा विभागाकडे
आरोग्य विभागाशिवाय इतर विभागांतील जे कर्मचारी मृत झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांकडून कागदपत्रे मागवून त्याची छाननी करण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी छाननी पूर्ण झालेले ४२ अर्ज लेखा विभागाकडे पाठवले असल्याचेही सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
- १५७ – एकूण करोनाबळी कर्मचारी
- ३२ – आरोग्य विभागातील कर्मचारी
- ११ – अर्ज केंद्र सरकारने मंजूर केले
- ७७ – अर्ज केंद्र सरकारने नाकारले
- ०५ – कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई