आधी दक्षिण आफ्रिका आणि नंतर इस्त्रायलमध्ये देखील करोनाचा नवा व्हेरिएंट अर्थात Omicron चे रुग्ण आढळल्यामुळे जगभर पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. एकीकडे तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असताना दुसरीकडे करनाचा नवा प्रकार आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे. काही देशांनी दक्षिण आफ्रिकेशी दळणवळणावर निर्बंध घातले. या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक करोना रुग्ण आढळलेलं शहर अर्थात मुंबईमध्ये देखील चिंतेचं वातावरण दिसू लागलं आहे. मुंबई महानगर पालिकेने ओमिक्रोन या करोनाच्या नव्या प्रकाराशी दोन हात करण्यासाठी तयारी सुरू केली असून यासंदर्भात मोठा निर्णय घेतला.

द. आफ्रिकेतून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला…!

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला क्वारंटाईन करावं, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या प्रवाशांच्या शरीरातून घेण्यात आलेले नमुने जेनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येतील, असं देखील महापौर म्हणाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

ओमिक्रोन व्हेरिएंटनं चिंता वाढवली, राज्यात निर्बंध लागणार?; अजित पवार म्हणाले…

विमान वाहतूक बंद करण्याची मागणी

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रोन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्यापासूनच तिथून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याची मागणी जोर धरी लागली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तशी मागणी केली आहे. “करोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळलेल्या देशांमधून भारतात येणारी विमानं थांबवण्यात यावी, अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना करतो. प्रचंड मेहनतीनंतर आपला देश करोनामधून आत्ता कुठे सावरला आहे. आता या नव्या व्हेरिएंटला आपल्या देशात प्रवेश करण्यापासून वाचवण्यासाठी आपण शक्य ते सर्व काही करायला हवं”, अशी विनंती अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना केली आहे.

पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या या करोना व्हेरिएंटला ओमिक्रोन हे नाव दिल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेनं सांगितलं की आत्तापर्यंत B.1.1.529 या नावाने ओळखला जाणारा हा व्हेरिएंट करोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने प्रसार होणारा असून यामुळे होणारा संसर्गही गंभीर स्वरुपाचा आहे असं सांगितलं जात आहे. तसंच ज्यांना आधी करोनाची लागण होऊन गेली आहे, त्यांना या विषाणूची लागण होण्याची शक्यता अधिक आहे.

जगभरात पसरलेल्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही हा नवा व्हेरिएंट अधिक घातक आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. तज्ज्ञांनाही ओमिक्रोनच्या उगमाबद्दल ठोस अशी माहिती मिळालेली नाही. मात्र हा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेसह बेल्जियम, बोटस्वाना, हाँगकाँग आणि इस्राइल या देशांमध्ये आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

Story img Loader