ज्येष्ठांचे मोतिबिंदू पिकल्याच्या प्रकरणांमध्ये वाढ; करोनाची बाधा होण्याची भीती आणि वाहतुकीच्या सुविधेचा अभाव
शैलजा तिवले, लोकसत्ता
मुंबई : करोनाची बाधा होण्याची भीती आणि टाळेबंदीमुळे दळवळणाच्या सुविधेचा अभाव यांमुळे अनेक रुग्णांनी डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी विशेषत: ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोतिबिंदू पिकल्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
गेल्या वर्षी याच महिन्यात करोनाचा हाहाकार उडाला आणि भीतीने रुग्णांनी रुग्णालयांकडे पाठ फिरविली. बहुतांश खासगी रुग्णालयांनी दरवाजे बंद केले. परिणामी अनेक नागरिकांनी आजारपण अंगावर काढले. त्यापैकी एक म्हणजे डोळ्यांच्या समस्या. डोळ्यातून पाणी येणे, धूसर दिसणे अशा अनेक तक्रारी असूनही ज्येष्ठांनी तपासणी किंवा उपचार घेणे या काळात टाळले. मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया झाल्या नाहीत. त्यामुळे बहुतांश रुग्णांमध्ये अधिक काळ उपचार न झाल्याने मोतिबिंदू पिकल्याचे दिसून येत आहे.
‘२०१९ या वर्षांच्या शेवटच्या तिमाहीमध्ये मोतिबिंदूची समस्या घेऊन आमच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांपैकी केवळ १० टक्के व्यक्तींच्या डोळ्यांतील मोतिबिंदू पिकल्याचे निदर्शनास आले होते. २०२० या वर्षांच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये या संख्येत ५० टक्के म्हणजे तब्बल पाचपट वाढ झाल्याची नोंद झाली आहे. बाधित होण्याच्या भीतीने अनेक रुग्ण उपचारासाठी आले नव्हते,’ असे नेत्रतज्ज्ञ डॉ. वंदना जैन यांनी सांगितले.
मोतिबिंदू पिकल्याच्या प्रकरणांमध्ये नक्कीच वाढ झाल्याचे दिसून येते, परंतु यामुळे रुग्णांची तात्पुरती दृष्टी कमी झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर दृष्टी पूर्ववत होईल. परंतु डोळ्यांच्या तीव्र समस्या झाल्याचे अद्याप तरी आढळलेले नाही, असे जे. जे. रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. शीव रुग्णालयातील नेत्रविकार विभागाच्या प्रमुख डॉ. छाया शिंदे यांनीही याला दुजोरा देत मोतिबिंदू पिकल्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असली तरी दृष्टी जाण्याइतपत तीव्र समस्या नसल्याचे संगितले.
वेळेत उपचार न मिळाल्याने काही रुग्णांमध्ये दृष्टीदोष निर्माण झाल्याचे फोर्टिस रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ पी. सुरेश यांनी सांगितले. ‘मधुमेही रुग्णांची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे. परंतु टाळेबंदीत या तपासण्या न झाल्याने नेत्रपटलावर गंभीर परिणाम झाल्यामुळे काही रुग्णांना दृष्टी गमावण्याची वेळ आली. तर काही काचबिंदू असलेल्या रुग्णांमध्ये आजाराची तीव्रता वाढल्यानेही काही प्रमाणात दृष्टीदोष झाल्याचे आढळले,’ असे डॉ. सुरेश यांनी सांगितले. रुग्ण नियमितपणे भेट देत नसल्यामुळे काचबिंदूंची समस्या गंभीर झाल्याचे दिसून आले. मधुमेह असलेल्या अनेक व्यक्तींनी डोळ्यांच्या तपासण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे डोळ्यातील पडद्यामध्ये गुंतागुंत निर्माण झाल्याचेही दिसून आल्याचे डॉ. जैन यांनी सांगितले.
विशेष लक्ष देणे गरजेचे
तीव्र डोळ्यांचे आजार असलेल्यांनी वेळेवर तपासणीसाठी जाणे गरजेचे आहे.
धूसर दिसणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळे लाल होणे यांसारख्या तक्रारी असल्यास नेत्रतज्ज्ञांचा तातडीने सल्ला घेणे.
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी वेळेत डोळ्यांच्या तपासण्या करून घेणे.
डोळ्यांच्या अन्य समस्यांमध्येही वाढ
घरून काम करताना सातत्याने संगणक, मोबाइल किंवा लॅपटॉपकडे पाहून डोळ्यांवर ताण येतो आणि डोळे कोरडे होण्याच्या समस्येचे प्रमाण १० वरून ३० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तेव्हा दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहू नये. अधूनमधून विश्रांती घेऊन डोळ्यांची उघडझाप करावी. डोळे दुखत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेत औषधोपचार घ्यावेत, असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे.
अजूनही उपचारांकडे पाठ
टाळेबंदी शिथिल झाल्यापासून ७० ते ८० टक्के रुग्ण उपचारासाठी आले आहेत, परंतु अजूनही सुमारे २० ते ३० टक्के रुग्ण करोनाच्या भीतीने उपचारासाठी आलेले नाहीत. मुखपट्टी, सुरक्षित अंतर नियम या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करत उपचारासाठी येणे शक्य असल्याचे डॉ. सुरेश यांनी अधोरेखित केले.