मुंबई, पुणे : Corona Virus Pateint Increses सुमारे सहा महिन्यांहून अधिक काळ नियंत्रणात राहिलेल्या करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात गुरुवारी ६९४ नवे रुग्ण आढळले. करोनाबाधितांचे प्रमाण सोलापूरमध्ये २०.०५ टक्के, तर सांगलीत १७.४७ टक्क्यांवर पोहोचले आहे.
गेल्या १५ दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. राज्यात सध्या करोनाचे ३०१६ उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यातील ७७३ रुग्ण पुण्यातील आहेत. महिन्याभरापूर्वी राज्यात करोनाबाधितांचे प्रमाण १.०५ टक्के होते. मात्र, २२ मार्च ते २८ मार्च या कालावधीत हे प्रमाण ६.१५ टक्क्यांवर गेले. सोलापूर (२०.०५ टक्के), सांगली (१७.४७ टक्के), कोल्हापूर (१५.३५ टक्के), पुणे (१२.३३ टक्के) या जिल्ह्यांत बाधितांचे प्रमाण अधिक आहे.
‘‘उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत असली तरी बहुतांश रुग्ण सौम्य लक्षणे असलेले आहेत. घरच्या घरी औषधोपचार घेऊन हे रुग्ण पूर्ण बरे होत आहेत. त्यामुळे काळजीचे कारण नाही’’, असे साथरोगतज्ज्ञ आणि राज्याचे करोनाविषयक तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले. मात्र, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले रुग्ण, लहान मुले, गर्भवती महिला यांनी काळजी घेण्याची गरज आहे. वर्धक मात्रेसह लसीकरण पूर्ण केले नसल्यास ते पूर्ण करणे आणि मुखपट्टीचा वापर करणे महत्त्वाचे आहे, असेही डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले.
दिल्लीत संसर्गदर १४ टक्क्यांवर
नवी दिल्ली : दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, संसर्गदर सुमारे १४ टक्क्यांवर पोहोचला आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांमध्ये ३०० नव्या रुग्णांची भर पडली असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच दिल्लीत इतक्या मोठय़ा प्रमाणावर रुग्णवाढ नोंदविण्यात आली. दिल्लीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांनी गुरुवारी तातडीने बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
देशात सहा महिन्यांतील उच्चांकी रुग्णनोंद
देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ३,०१६ रुग्ण आढळले. दैनंदिन रुग्णसंख्येचा गेल्या सहा महिन्यांतील हा उच्चांक आहे. गेल्या वर्षी २ ऑक्टोबरला दैनंदिन रुग्णसंख्या ३,३७५ इतकी नोंदविण्यात आली होती. त्यानंतर त्यात घट होत गेली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढ होऊ लागली असून, बाधितांचे दैनंदिन प्रमाण २.७३ टक्क्यांवर गेले आहे.