शैलजा तिवले

मुंबई : केंद्रीय आरोग्य विभागाच्या आदेशानुसार, करोनाबाधित असलेल्या परंतु अन्य कारणांमुळे मृत्यू झालेल्या अशा सुमारे साडेतीन हजार रुग्णांची नोंद करोना मृत्यूंमध्ये करण्याची प्रक्रिया  राज्याच्या आरोग्य विभागाने सुरू केली आहे. परिणामी पहिला आणि दुसऱ्या लाटेतील मृतांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे मृत्यू विश्लेषण अहवालातून निदर्शनास येत आहे.

करोनाबाधित झाल्यानंतर हृदयविकार, मूत्रिपडाचे आजार, क्षयरोग, पक्षाघात अशा अन्य आजारांनी मृत्यू झाल्यास याची नोंद इतर आजारांमुळे मृत्यू झालेले करोनाबाधित अशी केली जात होती.  या रुग्णांचा मृत्यू अन्य आजारांमुळे झाला असला तरी हे आजार बळावण्यासाठी करोनाचे विषाणू कारणीभूत असण्याची शक्यता आहे, तेव्हा या मृतांची नोंद ही करोना मृतांमध्येच करण्याबाबत  वादविवाद सुरू होते. राज्यात अन्य बहुतांश जिल्ह्यांमध्ये या मृत्यूची नोंद एकत्रित केली जात असली तरी मुंबई पालिकेत मात्र इतर आजारांमुळे मृत्यू झालेल्या करोनाबाधितांची स्वतंत्र नोंद होत होती. हा गोंधळ अन्य राज्यांमध्येही असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवरही मृतांच्या नोंदीबाबत तफावत दिसत होती. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने अखेर कोणत्याही कारणामुळे करोनाबाधितांचा मृत्यू झाल्यास करोना मृत्यूंमध्येच नोंद करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या. परंतु यानंतरही राज्यामध्ये याबाबत मतमतांतरे असल्यामुळे याची अंमलबजावणी  झाली नव्हती.

   राज्याच्या फेब्रुवारीच्या आकेडवारीनुसार पहिल्या लाटेत मार्च ते डिसेंबर २०२० मध्ये ५३ हजार ४५६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. या काळात मृत्यूदर २.७५ होता. परंतु आता इतर आजारांमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचेही एकत्रिकरण केल्यामुळे पहिल्या लाटेतील मृतांची संख्या सुमारे १०९१ ने वाढ झाली आहे. नव्या आकडेवारीनुसार पहिल्या लाटेमध्ये ५४ हजार ५४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढून २.८० वर गेले आहे.

दुसऱ्या लाटेतील मृतांच्या संख्येतही सुमारे २६०० ने वाढ झाली आहे. आधीच्या आकडेवारीनुसार दुसऱ्या लाटेत म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर २०२१ या काळात राज्यात ८६ हजार ३१० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला होता आणि मृतांचे प्रमाण १.८७ होते. आता ही संख्या ८८ हजार ९१५ झाली असून मृतांचे प्रमाण १.८२ वर गेले आहे. तिसऱ्या लाटेतील मृतांच्या संख्येतही काही प्रमाणात वाढ झाली आहे. असून जानेवारी ते मार्च २०२२ या काळात राज्यात २३३७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यातही महितीचे संकलन सुरू असल्यामुळे मृतांच्या संख्येत जवळपास ५० ने भर पडली आहे.

वयोगटनिहाय मृत्यूंचे प्रमाण कायम

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील इतर आजारांमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीचा समावेश केल्यामुळे वयोगटामधील मृतांच्या प्रमाणात फारसा बदल झालेला नाही. पहिल्या लाटेमध्ये ६० वर्षांवरील रुग्णांमध्ये जास्त मृत्यू झाले. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेतही हीच स्थिती कायम राहिली आहे. इतर आजारांमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये बहुतांश मृत्यू हे हृदयविकार किंवा पक्षाघातामुळे झालेले आहेत.

संशोधनास मदत

करोनामुळे या रुग्णांमधील आजाराची तीव्रता वाढली असल्याची शक्यता आहे. इतर आजारांमुळे झालेल्या मृत्यूचा करोना मृतांमध्ये समावेश केल्यानंतर याचा अभ्यास केला जाईल आणि करोनाचा परिणाम अन्य आजारांची तीव्रता वाढण्यात आहे का यावर संशोधन करण्यास यामुळे मदत होईल, असे मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

Story img Loader