संशयित रुग्ण हवालदिल, आठ प्रयोगशाळांना नोटीस
प्रसाद रावकर
मुंबई : वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी अजूनही चाचण्या, रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध, घरे र्निजतुक करणे अशा बाबी करताना पालिकेची तारांबळ उडत असल्याचे दिसत आहे. काही रुग्णांचे चाचणी अहवाल विलंबाने मिळत असल्यामुळे ते हवालदिल होत आहेत. दरम्यान, करोनाचा अहवाल विलंबाने देणाऱ्या आठ चाचणी प्रयोगशाळांवर प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ओमायक्रॉनचा धोका आणि एकूणच संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेत पालिका प्रशासन सज्ज झाले. मात्र, जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात मुंबईतील करोनाबाधितांच्या संख्येने २० हजारांचा आकडा ओलांडला. झपाटय़ाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे पालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षांवर प्रचंड ताण येऊ लागला. मोठय़ा संख्येने नागरिक करोनाची चाचणी करू लागल्याने प्रयोगशाळांचे व्यवस्थापन बिघडले आहे. रुग्णांचे करोना चाचणीचे अहवाल २४ तास उलटून गेले तरीही उपलब्ध होत नाहीत. अहवाल हाती आल्यानंतर बाधित रुग्णाचे घर र्निजतुक करण्यासाठी आणखी एक दोन दिवसांनी पालिकेचे कर्मचारी संबंधितांशी संपर्क साधतात. त्यानंतर आरोग्य स्वसंयेविका रुग्णांच्या घरी पोहोचून माहिती गोळा करण्याचे काम करतात. विलंबाने मिळालेल्या अहवालात आपण बाधित झाल्याचे समजताच रुग्ण खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने गृहविलगीकरणात राहातात. पालिकेची मदत मिळेपर्यंत त्यांचा गृहविलगीकरणाचा निम्मा कालावधी उलटून जातो.
विभाग कार्यालयांच्या पातळीवर बाधितांचे घर र्निजतुक करण्यासाठी संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थांच्या पथकांवर रुग्णांच्या घरी जाऊन र्निजतुकीकरण करण्याची जबाबदारी आहे. दर दिवशी किमान १०० हून अधिक बाधितांची घरे र्निजतुक करण्याची कामगिरी त्यांना करावी लागते. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे या कामासही विलंब होत आहे. आता रुग्णसंख्या कमी होऊ लागली असतली तरीही मोठय़ा संख्येने बाधितांच्या घरांचे र्निजतुकीकरण करताना पथकांतील कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.
दोन दिवसांत परिस्थिती आटोक्यात..
गेल्या दोन-तीन दिवसांपासून अचानक रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात घसरण होऊ लागली आहे. त्यामुळे पालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षांवरील ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र असे असले तरीही रुग्णशय्या, उपचार, गृहविलगीकरणात घ्यावयाची काळजी, घराचे र्निजतुकीकरण आदींबाबत माहिती मिळविण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक सतत नियंत्रण कक्षांशी संपर्क साधत आहेत.
प्रयोगशाळांना २४ तासांत उत्तर देण्याचे आदेश
गेल्या काही दिवसांमध्ये चाचणी अहवाल विलंबाने मिळत असल्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. चाचणी करणारे अनेक मुंबईकर पालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून आपल्या अहवालाबाबत विचारणा करीत आहेत. पालिका प्रसासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन करोना चाचणीचा अहवाल विलंबाने देणाऱ्या मुंबईतील आठ वैद्यकीय चाचणी प्रयोगशाळांवर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रयोगशाळांना येत्या २४ तासांमध्ये या नोटिशीचे उत्तर पालिकेला सादर करावे लागणार आहे. हे उत्तर समाधानकारक नसल्यास संबंधित प्रयोगशाळेविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
करोना चाचणीचा अहवाल २४ तासांमध्ये देण्याचे आदेश मुंबईतील वैद्यकीय प्रयोगशाळांना देण्यात आले आहेत. या आदेशांचे पालन न करणाऱ्या वैद्यकीय चाचणी प्रयोगशाळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल आणि समाधानकारक उत्तर न देणाऱ्या प्रयोगशाळेवर कडक कारवाई करण्यात येईल.
– सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त