मुंबई : अंथरुणाला खिळून असणाऱ्या राज्यभरातील रुग्णांना व वयोवृद्ध नागरिकांना  करोना लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिली आहे. अशा व्यक्तींच्या माहितीची ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर पथकामार्फत त्यांचे लसीकरण केले जाईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

अंथरुणाला खिळून असलेले रुग्ण व वयोवृद्धांना घरी जाऊन आरोग्य पथकाने लस द्यावी, यासाठी उच्च न्यायालय आग्रही होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ज्या व्यक्ती अंथरुणाला खिळून आहेत व पुढील सहा महिने परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता असेल, अशा व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी ही विशेष सुविधा आहे. अशा व्यक्तींची नावे व पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचे कारण आणि सदरची व्यक्ती, रुग्ण लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचे डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी माहिती covidvaccsbedridden@gmail.com  यावर पाठविण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ठाणे जिल्ह्यात आज लसीकरण बंद

ठाणे : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून लशींचा तुटवडा असतानाच, शनिवारी जिल्ह्याला ३० हजार ६८० लशींचा साठा प्राप्त झाला आहे. रविवारी अंबरनाथ शहरातील एका केंद्रावर लसीकरण सुरू राहणार आहे. तर ठाणे, कल्याण – डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर आणि ठाणे ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत. या भागातील केंद्रे सोमवारी पुन्हा सुरू होतील, असे महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Story img Loader