रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे पालिकेचा निर्णय
शैलजा तिवले
मुंबई : मुंबईतील चार जम्बो केंद्रे बंद करण्याच्या निर्णयानंतर शहरातील २४ विभागांमध्ये कार्यरत असलेली १६ हजार ५०० केंद्रे (करोना दक्षता केंद्र, सीसीसी १ आणि सीसीसी २) पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. करोनाची तिसरी लाट ओसरल्यामुळे रुग्णसंख्याही कमी झाली आहे. त्यामुळे उपलब्ध जम्बो केंद्रापैकी मुलुंडचे रिचर्डसन क्रुडास, गोरेगावचे नेस्को, दहिसर आणि कांजूरमार्ग ही चार जम्बो केंद्रे पालिकेने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही केंद्रे १ मार्चपासून पूर्णपणे बंद होणार आहेत. याबरोबरच करोना साथीच्या काळात विलगीकरणासाठी आणि लक्षणे नसलेल्या व्यक्तींना प्राथमिक उपचार देण्यासाठी सुरू केलेली करोना दक्षता केंद्रे म्हणजेच सीसीसी १ आणि सीसीसी २ हीदेखील पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
शहरात सध्या २४ विभागांमध्ये एकूण २१ हजार ८५८ सीसीसी १ केंद्रे आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे यातील १४ हजार ९०६ केंद्रे सध्या कार्यरत आहेत. सर्वाधिक केंद्रे एल्फिन्स्टन, मालाड, दादर येथे आहेत. रुग्णांच्या संपर्कातील जोखमीच्या आणि कमी जोखमीच्या व्यक्तींना या केंद्रामध्ये दाखल केले जाते. सीसीसी १ मध्ये सध्या ५४२ रुग्ण दाखल आहेत. सर्वाधिक रुग्ण भायखळा, कांदिवली (पश्चिम) आणि गोवंडी या भागात आहेत. शहरातील लक्षणेविरहित रुग्णांना घरामध्ये विलगीकरण करणे शक्य नसल्यास अशा रुग्णांना सीसीसी २ केंद्रांमध्ये दाखल केले जाते. मुंबईत यासाठी १३ हजार ७७७ केंद्रे पालिकेने विभागांमध्ये सुरू केली होती. रुग्णसंख्येचा वेग कमी झाल्यामुळे सध्या यातील १६५८ केंद्रे कार्यरत आहेत. यामध्ये सध्या केवळ पाच रुग्ण दाखल आहेत. सीसीसी १ आणि सीसीसी २ अशी एकत्रित १६ हजार ५६४ केंद्रे कार्यरत असून ही सर्व केंद्रे बंद करण्यात येणार आहेत. करोनाची तिसरी लाट ओसरल्यामुळे विभागस्तरावर सुरू केलेल्या सीसीसी १ आणि सीसीसी २ या केंद्रामध्येही फार कमी प्रमाणात रुग्ण दाखल केले जात आहेत. त्यामुळे ही केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रामधील सामग्रीचा वापर अन्य रुग्णालयांमध्ये केला जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.