बाधितांमध्ये लसवंतांचे प्रमाण किरकोळ; तरीही नियमांचे पालन महत्त्वाचे
मुंबई : करोना प्रतिबंधात्मक लशींच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या मुंबई शहरातील सुमारे २५ लाख ३९ हजार नागरिकांपैकी के वळ ०.३५ टक्के नागरिकांना करोनाची बाधा झाल्याचे पालिके ने केलेल्या अभ्यासात आढळले. यात सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक असून सर्वात कमी रुग्ण १८ ते ४४ वयोगटातील आढळले आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी लशींच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्या तरीही करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे असल्याचे यावरून अधोरेखित झाले.
पालिकेने अभ्यासामध्ये लशींच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या सुमारे २५ लाख ३९ हजार नागरिकांचा समावेश के ला. यातील ९००१ (०.३५ टक्के) नागरिकांना करोनाची बाधा झाली. लशींच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्यानंतर बाधा झालेल्यांचे प्रमाण अत्यंत कमी असले तरी यातदेखील ज्येष्ठ नागरिकांना करोनाची बाधा होण्याचे प्रमाण जास्त आहे. ज्येष्ठ नागरिकांमधील लशींच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांमध्ये ०.५९ टक्के नागरिकांना बाधा झाली, तर याखालोखाल १८ ते ४४ वयोगटातील ०.२६ टक्के आणि ४५ ते ५९ वयोगटातील ०.२४ टक्के जणांना संसर्ग झाला आहे.
मुंबईत मंगळवारपर्यंत ७४ लाख ६४ हजार १३९ नागरिकांनी लशीची पहिली तर ३१ लाख ३२ हजार २७४ जणांनी दुसरी मात्रा पूर्ण केली आहे.
मार्चपासून लस घेतलेल्यांची माहिती घेऊन त्याआधारे हा अभ्यास के ला आहे. लस घेतलेल्यांमध्ये बाधा होण्याचे प्रमाण अवघे ०.३ टक्के आहे. तेव्हा लसीकरण हे करोनापासून संरक्षणाकरिता प्रभावी माध्यम असल्याचे यावरून स्पष्ट होते. म्हणूनच मुंबईतील लसीकरण तिसरी लाट येण्याआधी वेगाने करण्याचा प्रयत्न आहे, असे पालिके चे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करून आता जवळपास आठ महिने उलटून गेले आहेत. तसेच निर्बंध शिथिल केल्यापासून या वयोगटातील व्यक्तींचा घराबाहेरील वावर वाढला आहे. यामुळेदेखील या वयोगटामध्ये इतरांच्या तुलनेत बाधित होण्याचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे, असे मत काकाणी यांनी व्यक्त केले.
अभ्यासात काय?
मुंबईतील लस घेतलेल्या सुमारे ६७ लाख १५ हजार नागरिकांचा विश्लेषणात्मक अभ्यास पालिकेने के ला आहे. यातील सुमारे ४१ लाख ७५ हजार नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली होती. पहिली मात्रा घेतलेल्यांपैकी १४ हजार २३९ म्हणजेच ०.३४ टक्के नागरिकांना करोनाची बाधा झालेली आहे. वयोगटानुसार बाधितांचे सर्वाधिक १.५२ टक्के प्रमाण हे ६० वर्षावरील नागरिकांमध्ये आढळले आहे. तर या खालोखाल ४५ ते ४९ मध्ये ०.७१ टक्के आणि १८ ते ४४ वयोगटात ०.१३ टक्के आढळले आहेत.
काळजी आवश्यकच…
लशींच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्या तरी संपूर्णपणे सुरक्षितता मिळाली असे म्हणता येणार नाही. ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकारशक्ती मुळात कमी असते. त्यामुळेच या वयोगटाला करोनाची बाधा होण्याची जोखीम अधिक आहे. त्यामुळेदेखील यांच्यात बाधित होण्याची शक्यता अधिक आहे. लशींच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्या तरी ज्येष्ठ नागरिकांनी गर्दीत जाणे शक्यतो टाळावे. बाहेर पडण्याची वेळ आली तरी मुखपट्टीचा वापर योग्य रीतीने करावा आणि सॅनिटायझर वापरावे, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.