थंडावलेल्या मोहिमेला दिवाळीनंतर गती
मुंबई : दिवाळीच्या दिवसांत घटलेले लसीकरण दिवाळीनंतर पुन्हा वाढले आहे. मुंबई महानगरात पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकूण दीड कोटी मात्रांचा टप्पा पार करण्यात आला आहे. यामध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे.
मुंबईसह देशभरात १६ जानेवारीपासून करोना प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरू झाली. टप्प्याटप्प्याने या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर आघाडीवरील कर्मचाऱ्यांसाठी ५ फेब्रुवारीपासून व ६० वर्षे वयावरील तसेच ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी १ मार्चपासून लसीकरण सुरू झाले. ४५ वर्षे वयावरील सर्व नागरिकांसाठी १ एप्रिलपासून, तर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी १ मेपासून लसीकरण सुरू करण्यात आले. विविध समाजघटकांसाठी विशेष लसीकरण मोहिमा राबवण्यात आल्या.
वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर आहे. मुंबईने दीड लाख लसीकरणाचा टप्पा बुधवारी पार केला. दोन्ही मात्रा मिळून १ कोटी ५० लाख ६७ हजार ८८३ मात्रा देण्यात आल्या आहेत.
लसवंतांची आकडेवारी
पहिली मात्राही न घेतलेल्या नागरिकांची संख्या अल्प असून साधारण ३१ हजार ५५० नागरिकांनी पहिली मात्राही घेतलेली नाही. आतापर्यंत ९२ लाख ०४ हजार ९५० (९९ टक्के) नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे. तर ५८ लाख ६२ हजार ९३३ (६३ टक्के) नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे.
१०० टक्क्यांसाठी…
जनगणनेच्या सांख्यिकी आधारे आणि पात्र नागरिकांची संख्या लक्षात घेता, शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपापल्या क्षेत्रात लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करून दिले. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र नागरिकांना लस द्यायची आहे.