|| संदीप आचार्य
मुंबई : केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यासाठी महाराष्ट्राला १ कोटी ९२ लाख करोना लसमात्रा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील १ कोटी ७० लाख लसमात्रा राज्याला, तर २२ लाख लसमात्रा खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहेत. राज्याची गरज लक्षात घेऊन आणखी एक कोटी लसमात्रा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश व गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राला सुरुवातीपासून केंद्राकडून कमी लसपुरवठा होत असून राज्याची लोकसंख्या व करोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन किमान तीन कोटी लसमात्रा मिळाव्यात, अशी मागणी राज्याने केंद्र सरकारकडे केली आहे. ऑगस्ट महिन्यात १ कोटी २० लाख लसमात्रा दिल्या जातील असे केंद्राकडून जाहीर करण्यात आले होते. त्या वेळी व जुलै महिन्यातही राज्याने केंद्राकडे अडीच कोटी लसमात्रांची मागणी केली होती. राज्यात सुमारे साडेचार हजार लसीकरण केंद्रे असून त्यांच्या माध्यमातून रोज १५ ते २० लाख लोकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. मात्र केंद्राकडून पुरेशा प्रमाणात लसमात्रा मिळत नसल्याने अनेकदा निम्मी लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागतात.

ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत जादा लसपुरवठा केल्याबद्दल राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांना पत्र पाठवून आभार मानले आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २० गावे येत असून दररोज किमान तीन गावांमध्ये लसीकरण झाले पाहिजे, यासाठी गावातील प्रतिष्ठित वक्ती, पोलीस पाटील, ग्रामसेवक तसेच आशांचे सहकार्य घेऊन घरोघरी लसीकरणाची माहिती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महापालिका व नगरपालिका स्तरावर व्यापक प्रसिद्धी करून लसीकरण सत्रे वाढवण्यास सांगितले आहे.

राज्य सरकारबरोबरच राज्यातील खासदारांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यास राज्याला हा पुरवठा होऊ शकतो, असेही आरोग्य विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.