पालिकेला उशिरा पुरवठा; लस केंद्रांवर पोहोचण्यास विलंब
मुंबई : सुरळीत लसपुरवठा होत नसल्याने मुंबईतील लसीकरणाची गती पुन्हा मंदावली आहे. सोमवारी सायंकाळी संपलेला साठा आणि रात्री उशिरा पुरवठा झाल्यामुळे मंगळवारच्या लसीकरणाबाबत साशंकता होती, मात्र साठा केंद्रांवर पोहोचून लसीकरण सुरू व्हायला दुपारचे दोन वाजले.
नव्या लसीकरण धोरणानंतर लसपुरवठा सुरळीत होईल आणि लसीकरण वेगाने सुरू होईल, असे चित्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात दिसत होते. या काळात पालिकेनेही प्रतिदिन सुमारे ८० हजारांहून अधिक लसीकरणही केले. परंतु जुलैपासून लशीचा पुरवठा सुरळीत नसल्यामुळे अनेकदा दिवसातून तीनच तास लसीकरण केले जात आहे. परिणामी, प्रतिदिन लसीकरणाची संख्याही सुमारे तीस हजारांपर्यंत घसरली आहे.
गेल्या आठवड्यात तर लशीचा साठा उपलब्धच नसल्यामुळे लसीकरण बंद करण्याची वेळ आली. लशींचा पूर्ण खडखडाट झाल्यानंतरच रात्री उशिरा साठा दिला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा साठा वाटप करून दुपारी दोननंतरच लसीकरण सुरू करावे लागते. त्यामुळे मनुष्यबळासह सर्व व्यवस्था उपलब्ध असूनही केवळ तीनच तास लसीकरण केले जाते. लशींचा साठा सुरळीत उपलब्ध होत नसल्यामुळे मनुष्यबळासह सर्व सुविधांचा वापर योग्यरीतीने केला जात नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील लशींचा साठा सोमवारी पूर्णपणे संपल्यामुळे मंगळवारी सकाळी अनेक केंद्रे बंद होती. सोमवारी रात्री उशिरा सुमारे ९५ हजार लशींच्या मात्रा प्राप्त झाल्या. यांचे वाटप सकाळी केले आणि त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास अनेक केंद्रावर लसीकरण सुरू झाले. साठा सुरळीत प्राप्त झाला तर आम्हालाही योग्य नियोजन करून अधिकचा साठा केंद्रांना देणे शक्य असते. पालिकेची एका दिवसाची क्षमताच एक लाखापेक्षा अधिक असूनही लशीच्या मात्रा एवढ्याच प्राप्त होत असून त्यापुढील तीन ते चार दिवस पुरवाव्या लागतात, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
दुसऱ्या मात्रेचे लाभार्थी ताटकळत
दुसऱ्या मात्रेच्या अनेक लाभार्थींचे ८४ दिवस उलटून गेले आहेत, मात्र तरीही लस गोंधळामुळे दुसरी मात्रा मिळू शकलेली नाही. एकीकडे दुसऱ्या मात्रेसाठीही वेळ आरक्षित करता न येणे आणि दुसरीकडे पुरेसा साठा नसल्यामुळे केंद्रावरही पूर्वनोंदणी न करता रांगा लावूनही लस न घेताच परत जावे लागत असल्याने नागरिक आता संतप्त झाले आहेत.
नियोजनात अडथळे
लशींचा साठा पुरेसा आल्यास वेळा आरक्षित करण्याची एक ठरावीक वेळ देणे, नोंदणीतील अडचणी दूर करणे यावर काम करता येईल. परंतु दर दिवशी संध्याकाळी साठा किती शिल्लक आहे, दुसऱ्या दिवशी केंद्रांना देता येईल का, कमी असल्यास कोणत्या केंद्रांना प्राधान्याने द्यायची हीच चिंता आम्हाला लागलेली असल्यामुळे याकडे लक्ष देणे शक्यच होत नाही, असे मत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.