दिवसभरात ११ लाख नागरिकांना मात्रा
मुंबई : करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने शनिवारी पुन्हा एकदा चांगली कामगिरी करीत दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम नोंदविला आहे.
एकाच दिवशी सुमारे अकरा लाख नागरिकांचे लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या विभागाचे अभिनंदन केले आहे. दिवसाला १० लाखापेक्षा अधिक लसीकरण केले जाऊ शकते, हे आज आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले असून याहीपेक्षा अधिक लसीकरणाची राज्याची क्षमता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत शनिवारी सायंकाळी सातपर्यंत पाच हजार २०० लसीकरण केंद्रांवर १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांना लस देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ३ जुलै रोजी आठ लाख ११ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी कामगिरी नोंदविली होती. त्यानंतर स्वातंत्र्यादिनाच्या पूर्वसंध्येला नऊ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन राज्याने आधीचा विक्रम मोडला. आजच्या सर्वोच्च संख्येने झालेल्या लसीकरणानंतर एक नवा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी नमूद केले.
उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने नागरिकांना आतापर्यंत पाच कोटींहून अधिक लसमात्रा देण्याचा टप्पा नुकताच ओलांडून विक्रमी कामगिरी केली आहे.
मुंबईतील कामगिरी
मुंबईत शनिवारी पालिकेच्या केंद्रांवर १ लाख ३ हजार ३२५ जणांनी लस घेतली. यात सर्वाधिक ६३ हजार ८८९ मात्रा १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी घेतली आहे. खासगी रुग्णालयात ५२ हजार ७१७ जणांना लस देण्यात आली.