केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी

मुंबई : लशींचा साठा रविवारी प्राप्त झाल्यामुळे तीन दिवस बंद असलेले मुंबईतील लसीकरण अखेर सोमवारी सुरू झाले. त्यामुळे अनेक केंद्रांवर गर्दी होती. यात प्रामुख्याने दुसरी मात्रा घेण्यासाठी आलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण अधिक होते.

लशींचा साठा गेल्या गुरुवारी संपल्यानंतर शहरात शुक्रवार ते रविवार लसीकरण बंद होते. रविवारी पालिकेला १ लाख ३० हजार लशींच्या मात्रा मिळाल्या. यात कोव्हिशिल्डच्या ८५ हजार तर कोव्हॅक्सिनच्या ४० हजारांहून अधिक मात्रांचा समावेश आहे. त्यामुळे सोमवारी ३०० हून अधिक केंद्रांवर लसीकरण आयोजित केले होते. तीन दिवस लसीकरण बंद असल्यामुळे सोमवारी शहरातील अनेक केंद्रांवर लस घेण्यासाठी झुंबड उडाली होती. सोमवारी ५० टक्के पूर्वनोंदणीने आणि ५० टक्के पूर्वनोंदणीशिवाय लसीकरण सुरू होते. त्यामुळे अनेकांना लस न घेताच परत जावे लागले.

तीन दिवस लसीकरण बंद असले तरी नागरिक लस मिळेल या आशेने फेऱ्या मारत होते. सोमवारी तर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. परंतु त्या तुलनेत लशींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना परत जावे लागले, अशी माहिती गोरेगाव येथील लसीकरण केंद्रातील डॉक्टरांनी दिली. ‘सोमवारी पूर्वनोंदणीधारकांना लस मिळाली. परंतु नोंदणीशिवाय येणाऱ्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे सकाळीच टोकन दिले गेले. उर्वरित जणांना परत पाठवावे लागले’, असे वरळी येथील लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

पुन्हा तुटवड्याची शक्यता

पालिकेच्या लसीकरण क्षमतेच्या तुलनेत रविवारी आलेला साठा कमी असून दोन दिवस पुरेल इतकाच आहे. त्यामुळे पुढील साठा वेळेत न आल्यास पुन्हा तुटवडा भासण्याची शक्यता आहे, असे मत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. लशींचा आणखी काही साठा मिळाल्यास सुरळीत लसीकरण सुरू राहील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

 

Story img Loader