अजित पवारांच्या सूचनेला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील
मुंबई : करोनावरील लशींचा साठा संपल्याने अनेक सरकारी केंद्रांवरील लसीकरण वारंवार बंद ठेवावे लागत आहे. दुसऱ्या लस मात्रेसाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागत असताना राज्यातील या लसटंचाईवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत खासगी रुग्णालयांत पडून असलेल्या लशींचा वापर करण्याचा तोडगा सुचवला. त्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दर्शवला असून लसटंचाई कमी होऊन लसीकरण वाढवण्यासह प्रामुख्याने दुसऱ्या लस मात्रेच्या प्रतीक्षेत असलेल्यांना लस देण्यासाठी त्याचा उपयोग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकांतर्फे सुरू असलेल्या लसीकरणाला अपुऱ्या पुरवठ्याचा फटका बसत आहे. त्याचबरोबर दुसऱ्या लस मात्रेसाठी प्रतीक्षा करणाऱ्यांनाही या लसटंचाईचा फटका बसत आहे. त्यांचे लसीकरणाचे वेळापत्रक बिघडत आहे. राज्यातील विविध शहरांतील या परिस्थितीचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. निर्बंध शिथिलीकरण करत असताना लसीकरणाचा वेग वाढवा, दुसऱ्या मात्रेसाठी पात्र असलेल्या पण अपुऱ्या लसींमुळे खोळंबलेल्या लोकांना प्राधान्याने लस द्या, अशी मागणी अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत के ली.
पुण्यातही अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. त्याचवेळी खासगी रुग्णालयांकडे मात्र मोठ्या प्रमाणात लससाठा पडून आहे, याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधले. हा पडून असलेला लससाठा राज्य सरकारने घ्यावा. तो लसीकरणासाठी वापरल्यास लसटंचाईवर तोडगा निघेल.
नंतर राज्य सरकारने गरजेनुसार संबंधित रुग्णालयांना लस पुरवठा करावा, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हा उपाय चांगला असल्याचे सांगत हिरवा कं दील दाखवला. त्यानुसार आता खासगी रुग्णालयांकडे पडून असलेला लस साठा कर्जतत्त्वावर राज्य सरकार घेईल व नंतर बाहेरून लस घेऊन रुग्णालयांच्या गरजेनुसार त्यांना तो साठा टप्प्याटप्प्याने परत केला जाईल, असे ठरले.