|| शैलजा तिवले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रायगड, औरंगाबादमध्ये १५ टक्के तफावत

मुंबई : राज्यभरात आतापर्यंत झालेल्या लसीकरणामध्ये पुरुषांची टक्केवारी अधिक असून त्या तुलनेत महिलांचे लस घेण्याचे प्रमाण सुमारे नऊ टक्क््यांनी कमी आहे. रायगड, औरंगाबादमध्ये तर ही तफावत जवळपास १५ टक्के आहे. मुंबई, नाशिक, पुणे या शहरांमध्येही हा फरक ठळकपणे निदर्शनास येत आहे.

आरोग्य समस्या, लसीकरण यांबाबत महिलांना पुरुषांच्या तुलनेत प्राधान्य दिले जात नसल्याचे देशभरात प्रथमच एवढ्या मोठ्या पातळीवर राबविलेल्या प्रौढांच्या लसीकरणामध्येही निदर्शनास येते. देशात लसीकरणात पुरुष आणि महिलांच्या प्रमाणात तफावत असून लस घेतलेल्यांमध्ये ५४ टक्के पुरुष, तर ४६ टक्के महिला आहेत. ‘कोविन’ सरकारी संकेतस्थळाच्या आकडेवारीनुसार, राज्यात शुक्रवारपर्यंत सुमारे तीन कोटी २६ लाख लसमात्रा दिल्या आहेत. यातील सुमारे एक कोटी ७७ लाख मात्रा पुरुषांना दिल्या  आहेत, तर एक कोटी ४९ लाख मात्रा महिलांना दिल्या गेल्या आहेत.

 

कुठे, किती फरक?

– रायगडमध्ये आतापर्यंत सहा लाख ७२ हजार नागरिकांना लस देण्यात आली, त्यांतील ५७ टक्के पुरुष, तर ४२ टक्के महिला.

– औरंगाबादमध्ये आठ लाख ८७ हजार मात्रा दिल्या असून तेथेही पुरुष आणि महिलांच्या लसीकरणामध्ये सुमारे १५ टक्क्यांची तफावत.

– ग्रामीण भागात सोलापूर, बीड, अहमदनगर, पालघर, लातूर, उस्मानाबादमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरण १० टक्क््यांनी कमी.

मुंबई, नाशिकमध्ये…

मोठ्या शहरांत लसीकरणामध्ये पुरुष आणि महिलांच्या प्रमाणात तफावत असल्याचे आढळले. मुंबईत सुमारे ५७ लाख ३७ हजार मात्रा दिल्या गेल्या आहेत. त्यांत पुरुषांचे प्रमाण ५५ टक्के, तर महिलांचे ४४ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. दोन्हींतील ही तफावत १० टक्क्यांहूनही अधिक आहे. पुण्यामध्येही हेच चित्र आहे. नाशिकमध्ये पुरुषांचे प्रमाण ५५ टक्के आणि महिलांचे प्रमाण ४४ टक्के आहे. त्यांच्यातील फरक ११ टक्क््यांहून अधिक आहे.

 

गोंदियामध्ये महिला पुढे

राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यात लसीकरणामध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत सुमारे दीड टक्क्याने अधिक आहे. गोंदियामध्ये आत्तापर्यंत सुमारे चार लाख ६८ हजार मात्रा दिलेल्या असून यात ४९ टक्के मात्रा पुरुषांना, तर ५१ टक्के मात्रा स्त्रियांना दिल्या आहेत.

लसीकरणामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेदभाव करणे अयोग्य. स्त्रियांचा सहभाग वाढविण्यासाठी अधिक प्रशिक्षणाची गरज आहे. – डॉ. शशांक जोशी, सदस्य, करोना कृती दल

 

करोनामुळे मुंबईतून स्थलांतरित झालेली अनेक कुटुंबे परतलेलीच नाहीत. नोकरी करणारे पुरुषच परतले आहेत. त्यामुळे अशा तफावतीची शक्यता आहे. मुंबईत स्थलांतरित होऊन कामासाठी येणाऱ्या पुरुषांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्याही कमी आहे, हेही एक कारण असू शकते. – डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका

..

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे लसीकरण कमी का होत आहे, याचा वयोगट आणि आरोग्य, अत्यावश्यक कर्मचारी या गटानुसार सखोल अभ्यास केल्यानंतरच ठोस कारणे समजू शकतील. – डॉ. अर्चना पाटील, संचालक, आरोग्य आयुक्तालय

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection women are less vaccinated than men akp