देशभरात करोना व्हायरसने थैमान घातला असताना महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्त रुग्णाचं निधन झालं आहे. यामुळे भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. संबंधित ६४ वर्षीय व्यकी घाटकोपरला वास्तव्यास होती. दुबईतून परतल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. यामुळे त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दुबईहून प्रवास केलेल्या रुग्णाचा आज सकाळी सात वाजता कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. सदर व्यक्तीची कोरोनाची चाचणी झाली होती. मात्र या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला की अन्य पूर्व आजारामुळे याची खात्री केली जात आहे”. पुढे त्यांनी सांगितलं की, “ही व्यक्ती ५ मार्चला दुबईहून आली होती. त्यांना ७ मार्चला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर श्वसनासंबंधीच्या आजाराचे उपचार सुरू होते. त्यांनंतर त्यांना कस्तुरबा मध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांनी औषधोपचाराला प्रतिसाद दिला. आज सकाळी सात वाजता त्यांचा मृत्यू झाला”.

भारतात करोनामुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या मृत्यूची नोंद कर्नाटकात झाली होती. कर्नाटकमध्ये ७९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राजधानी दिल्लीत दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यात दिल्लीमधील राम मनोहर लोहिया रुग्णालयात ६८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.

देशात करोनाची लागण झालेल्या सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण करोना रुग्णांची संख्या १२७ वर पोहोचली आहे.

Story img Loader