मिरा रोड येथील नया नगर परिसरात राहणाऱ्या 55 वर्षीय व्यक्तीचा करोनाचा तपासणी अहवाल खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे या रुग्णाला मुंबईतील  कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तपासणी करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा रुग्ण गेल्या काही काळापासून  कर्करोग आणि मधुमेहामुळे त्रस्त होता. आठ दिवसांपूर्वी त्याला  निमोनिया झाल्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्याच्यात करोनाची  लक्षणें आढळून येत असल्यामुळे रुग्णालयाकडून कोवीड-19 तपासणी करण्यात आली. ज्याच्या अहवालात संबंधित रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने याबाबतची माहिती मिरा भाईंदर महानगरपालिकेला देण्यात आली. पालिका प्रशासनाकडून संबंधित रुग्णास तत्काळ मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून  त्याच्या घरातील पाच जणांना देखील तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच रुग्ण राहत असलेल्या परिसरातील इमारतींना पालिकेकडून आयसोलेट करण्यात आले आहे. हा रुग्ण काही दिवसांपूर्वी पुण्याला देखील जाऊन आल्याचे पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितले आहे.

आतापर्यंत मिरा भाईंदरमध्ये 620 नागरिक हे परदेशातून आले असून यापैकी 393 नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर 227 नागरिकांना 14 दिवसांच्या तपासणी नंतर घरी सोडण्यात आले आहे. त्याचप्रकारे 357 नागरिकांचे घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. दररोज या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus corona suspected found at mira road msr