महाराष्ट्राची आणि मुंबईची चिंता वाढवणारी काही प्रकरणं आता हळहळू समोर येऊ लागली आहेत. राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशनद्वारे करोनाचा शिरकाव झाला नसल्याच्या दाव्याला छेद देणाऱ्या घटना मागील काही दिवसात समोर आल्या आहेत. या घटनांतून करोनानं धोकायदायक ठरणाऱ्या कम्यनिटी ट्रान्समिशनमध्येही चंचुप्रवेश केला असल्याचंच दिसत आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

२० मार्च रोजी महाराष्ट्रात करोनाचा पहिला असा रुग्ण आढळून आला जो परदेशात गेलेला नव्हता. करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यानं पुण्यातील या ४१ अंगणवाडी सेविकेला संसर्ग झाला होता. त्यानंतर राज्यात असे आठ रुग्ण आढळून आल्याचं राज्याच्या आरोग्य विभागानं सागितलं. मात्र, कम्युनिटी ट्रान्समिशनपर्यंत करोना पोहोचलेला नाही, असा दावा सरकारकडून केला जात आहे. पण समोर आलेल्या या आठ प्रकरणांनी धोक्याची घंटा वाजवली आहे, असं तज्ज्ञ सांगत आहेत.

मुंबईतील कांदिवली परिसरात राहणाऱ्या रिक्षा चालकाच्या एका ४० वर्षीय पत्नीला करोनाची लागण झाली. या महिलेचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. केईएम रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू होते. मुंबई महापालिकेकडून या महिलेला नेमकी करोनाची लागण कशी याचा शोध घेतला जात आहे. कारण ही महिला मागील काही दिवसांपासून घरातून बाहेर पडलेली नव्हती.

मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेचा करोनाची लागण झाल्यानं मृत्यू झाला. कस्तुरबा रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू होते. तिला करोना झाल्याचं निदान झाल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे २६ मार्च रोजी या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला प्रभादेवी परिसरात वडापाव विकायची. या महिलेलाही कशामुळे करोनाची लागणं झाली, याचा शोध महापालिकेचे अधिकारी घेत आहे.

दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका ६४ वर्षीय व्यक्तीचा करोनानं मृत्यू झाला. करोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर २१ दिवसांनी म्हणजेच २१ मार्च रोजी या व्यक्तीचा एनएन रिलायन्स रुग्णालयात मृत्यू झाला. हा व्यक्ती सुरतहून ट्रेननं परत आला होता. मात्र, या व्यक्तींना बाहेरचा प्रवास केला नव्हता, त्याचबरोबर संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातही ते आले नव्हते, असं त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

मुंबईतीलच एका ५३ वर्षीय डॉक्टरला करोनाची लागण झाली. २७ मार्च रोजी आलेल्या रिपोर्टमध्ये हे निष्पन्न झालं. या डॉक्टरनं परदेशात प्रवास केलेला नाही. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी आता या डॉक्टरकडं गेल्या काही दिवसात तपासणीसाठी आलेल्या त्या रुग्णाचा शोध घेत आहेत.

याच घटनांबरोबर २९ मार्च रोजी मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ६६ वर्षीय महिलेला करोनाचं निदान झालं. जोगेश्वरी ट्रामा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ५७ वर्षीय महिलेला, राजवाडी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २३ व्यक्तीला करोना झाल्याचं रिपोर्टमधून निष्पन्न झालं. त्याचबरोबर मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयात दाखल केलेल्या ६३ वर्षाच्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. या सगळ्यांनी देशाबाहेर कुठेही प्रवास केलेला नव्हता. करोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्यानं त्यांना संसर्ग झाला.

तज्ज्ञ काय म्हणतात?

या घटनासंदर्भात बोलताना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात कार्यरत असलेले सांसर्गिक आजारांचे तज्ज्ञ डॉ. तनू सिंघल म्हणाल्या,’ ही तुरळक प्रकरणं म्हणजेच कम्युनिटी ट्रान्समिशन आहे. जोपर्यंत रिर्पोट पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण कमी आहे, तोपर्यंत हे चिंताजनक नाही,’ असं त्यांनी सांगितलं.

‘साथीच्या आजारांमध्ये अशी प्रकरणं म्हणजे धोक्याची घंटाच असतात. देशातील न्यमोनियांच्या रुग्णांच प्रमाणही कमी झालेलं नाही. अशा रुग्णांवरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे,’ असं डॉ. प्रदीप अमिन म्हणाले.

राज्याचे साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप आवटे याविषयी बोलताना म्हणाले, ‘ राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशन कुठेही दिसून आलेलं नाही. जर कम्युनिटी ट्रान्समिशनद्वारे संसर्ग झाला तर ग्रामीण भागात प्रचंड रुग्ण वाढतील. तसं अद्यापपर्यंत झालेलं नाही,’ असं डॉ. आवटे यांनी सांगितलं.