राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. सगळीकडं संचारबंदी असून, जनजीवन ठप्प झालं आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वाढत असल्यानं सरकारनं तातडीनं हे पाऊल उचललं होतं. मात्र, या सगळ्या चिंताजनक वातावरणात मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक ३१ मार्च रोजी बोलावण्यात आली आहे. त्यावरून ‘मुंबई महापालिकेच्या स्टँडिंगमध्ये कसलं अंडरस्टँडिंग सुरू आहे?,’ अशी शंका भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केली आहे.

राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे, हे निर्दशनास आणून देत आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांना पत्र पाठवले आहे. ‘कर्फ्युत मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक का घेतली जातेय? एखादा आरोग्याचा विषय सोडला तर काहीच महत्त्वाचा अजेंडा नसताना अट्टाहास का? आता पुन्हा ३१ मार्चला बैठक कशासाठी? सगळं जग करोनाच्या विरोधात लढत असताना पालिकेच्या स्टँडिंगमध्ये कसलं अंडरस्टँडिग सुरु आहे?,’ असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे.

महापौरांना पत्रात काय म्हणाले शेलार?

आशिष शेलार यांनी महापौरांना पाठवलेल्या पत्रात ३१ मार्च रोजी बोलावलेल्या स्थायी समितीच्या बैठकीचा मुद्दा उपस्थित केला आहे. यापूर्वी झालेल्या सभेत आरोग्याचा प्रश्न सोडला तर अन्य कोणताही तातडीचा विषय नव्हता. तरीही सभा घेण्याचा अट्टहास करण्यात आला. पुन्हा आता ३१ मार्चला सभा बोलावण्यात आली आहे. एकीकडे महापालिका यंत्रणेवर करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड ताण आहे. तर आरोग्याच्या दृष्टीनं अशा सर्व प्रकारच्या शासकीय कामांमध्ये बदल केला असतानाही स्थायी समितीची सभा वारंवार बोलावणं कितपत योग्य आहे?, असं शेलार यांनी म्हटलं आहे.