करोनाचा संसर्ग फैलावत असल्यानं राज्य सरकारकडून अनेक प्रतिबंधात्मक पावलं उचलण्यात आली. मात्र, सरकारच्या आवाहनाला नागरिक गांभिर्यपूर्वक प्रतिसाद मिळत नसल्यानं अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली. मात्र, त्यानंतरही तरुणांसह नागरिक रस्त्यावर फिरतांना दिसत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईत रस्त्यावरून जात असताना तरुणाचं घोळका दिसला. त्यावेळी त्यांनी गाडी थांबवून तरुणांना हाकलले. याचा व्हिडीओ त्यांनी शेअर करून खंत व्यक्त केली आहे.

राज्यात सोमवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली. करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं तातडीनं हा निर्णय घेतला. मात्र, संचारबंदी लागू असतानाही अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकारनं पोलिसांना वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

संचारबंदी लागू झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख हे मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेत होते. त्यांचा ताफा रस्त्यानं जात असताना त्यांना तरुणांसह नागरिक इमारतींच्या खाली बसून असल्याचं दिसलं. त्यांनी लागलीच गाडी थांबवली. त्यानंतर ते खाली उतरून त्यांनी लोकांना घरी जाण्यास सांगितले.

त्यांनी याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘मुंबईमध्ये कर्फ्यूची पाहणी करताना काही लोक अनावश्यक घराबाहेर हिंडताना आढळले. ‌त्यांना समज देऊन घरी परतायला सांगावं लागतंय ही खेदाची बाब आहे. कोरोनाचे गांभीर्य सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. जे कायद्याचे उल्लंघन करतील अशांविरुद्ध पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत..,’ असा इशारा त्यांनी दिला.

Story img Loader