राज्यातील करोनाचं थैमान सुरूच आहे. करोनानं मुंबई, पुण्याला विळखा घातला असून, हळूहळू राज्यातही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. रविवारी राज्यातील करोनाग्रस्तांचा आकड्यानं सत्तरी ओलांडली. मुंबईत सहा, तर पुण्यात चार जणांना करोनाची लागण झाल्याचं चाचणी अहवालातून निष्पन्न झालं आहे.

पुणे, मुंबई ही दोन प्रचंड लोकसंख्या असलेली शहरं करोनानं वेढत चालली आहे. महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला होता. या दाम्पत्याच्या संपर्कात आलेल्या तिघांना करोनाची लागण झाली आणि हळूहळू करोना राज्यात फैलावत गेला. पहिल्या आठवड्यात फारशी संख्या कमी होती. मात्र, त्यानंतर करोनाच्या संख्येत आश्चर्यकारक वाढ झाली. रविवारी हा आकडा ७४ वर पोहोचला.

पुण्यात आणखी चार नवे रुग्ण सापडले आहेत. तर मुंबई सहा जणांना लागण झाली आहे. यातील पाच जण परदेशातून आले आहेत. तर चार जणांना करोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग झाला आहे. यातील एकाची माहिती अजून कळालेली नाही.

मुंबईत एकाचा मृत्यू

महाराष्ट्रात पाय पसरू पाहणाऱ्या करोनानं राज्यात दुसरा बळी घेतला. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होत असतानाच मुंबईत एका करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे मृत्यू झालेली मुंबईतील ही दुसरी व्यक्ती आहे. ६३ वर्षीय करोनाबाधित व्यक्तीवर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु होते. २१ मार्च रोजी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला मधुमेह (डायबेटिस), उच्च रक्तदाब (बीपी) आणि ह्रदयाशी संबंधित आजार होता. करोनाची लागण झाल्याने त्यांना दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान मृत व्यक्तीच्या पत्नीलाही करोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.