करोनाबाधित रुग्णांचे मृतदेह नेण्यास वेळेत न येणारे नातेवाईक, चतुर्थश्रेणी कामगाराचा तुडवडा यामुळे वार्डमध्ये रुग्णाच्या शेजारी मृतदेह ठेवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मुंबईमधील पालिकेच्या रुग्णालयामध्ये समोर आली. शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील करोनाबाधित रुग्णांच्या वॉर्डमध्ये चार मृतदेह खाटांवरच तसेच ठेवल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाल्यानंतर पालिकेने चौकशी समिती नियुक्त केली आहे. हे प्रकरण ताजे असतानचा आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी याच रुग्णालयामध्ये एक करोना रुग्ण खिडकीतून उडी मारुन पळून गेल्याचा दावा करणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ट्विटवरुन सोमय्या यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
टिळक रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक पाचमधील व्हिडिओ सोमय्या यांनी पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाल्याचे दिसून येत आहे. तीन मे रोजी रात्री नऊ वाजून २५ मिनिटांनी या वॉर्डमधून एक करोनाचा रुग्ण खिडकीतून उडी मारुन रुग्णालयाच्या लॉबीमध्ये येतो. एक नर्स आणि काही आरोग्य कर्मचारी त्याच्या मागे धावत येतात. मात्र हा रुग्ण लगेच रुग्णालयाबाहेर पळून जाताना दिसत आहे. या रुग्णाला नंतर रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनी पकडून परत आणल्याचे समजते.
वाह रे वाह ठाकरे सरकार असा टोला सोमय्या यांनी आपल्या ट्विटमधून लगावला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपालाही टॅग केलं आहे. “शीव येथील रुग्णालयातील आणखीन एक व्हिडिओ. कोविड-१९ पॉझिटीव्ह रुग्ण ३ मे रोजी रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी रुग्णायलाच्या खिडकीमधून उडी मारुन पळून गेला. नंतर याला सुरक्षा रक्षकांनी परत आणले. मात्र हा तोच वॉर्ड आहे जिथे रुग्णांना मृतदेहांबरोबर ठेवण्यात आलं आहे,” असा दावा सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.
Another Video of Sion Hospital Corona Ward 5, a COVID19 Patient jumps out from Ward/Window on 3 May 9.25pm. Subsequently brought back by Security Persons. this is same ward, where Dead Bodies kept with Live Patients.
Vah re Thackeray Sarkar!!@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/eS3h6m5IAl
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 8, 2020
गुरुवारी याच रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार सुरु असणाऱ्या वॉर्डमध्येच मृतदेह ठेवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. रुग्णांच्या शेजारच्या खाटांवर असलेले मृतदेह व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येतात. हा वॉर्ड करोना रुग्णांचा असूनही रुग्णाच्या नातेवाईकांपासून सर्वाचा वावर दिसतो. त्यामुळे विलगीकरण कक्षाचे नियम, मृतदेहाची अध्र्या तासात विल्हेवाट लावण्याचे आदेश हे सारेच येथे धाब्यावर बसविले आहे का, असे अनेक सवाल भाजपाच्या नेत्यांनी गुरुवारी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून उपस्थित केल्याचे दिसून आलं. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह बांधण्यापासून त्याची विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या नियमावली केंद्र सरकारपासून ते अगदी पालिकेनेही जाहीर केली आहे. मात्र याबाबत रुग्णालयातील संबंधित प्रत्येक विभागाने काय करावे याबाबत स्पष्ट नियमावली रुग्णालयाने न केल्याने अनेक रुग्णालयांमध्ये सावळागोंधळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
सरकारच्या संवेदना नष्ट झाल्या आहेत का- शेलार
शीव रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांच्या शेजारी मृतदेह पडून असल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी सरकार व महापालिकेच्या संवेदना नष्ट झाल्या आहेत का, असा सवाल केला आहे. शेलार यांनी पालिका व सरकारच्या कारभारावर टीका करून गरिबांची क्रूर चेष्टा थांबवावी. केंद्र सरकारच्या पथकाने येथील परिस्थिती पाहून काही सूचना केल्या होत्या. आयसीएमआरची मार्गदर्शक तत्वे पाळण्यास सांगितले होते. पण त्यावर राजकारण करण्यात आले, अशी टीका शेलार यांनी केली.