औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेनंतर तरी किमान यातून बोध घेण्याची नितांत गरज असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच केंद्र सरकार रेल्वे देण्यास तयार आहे त्यामुळे पायी जाण्यापासून तत्काळ रोखावे आणि केंद्र सरकारशी समनव्य साधून त्यांना रेल्वेने प्रवास करता येईल अशी व्यवस्था करावी अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, ‘अजूनही बरेच कामगार बांधव रस्त्याने पायीच प्रवास करताना दिसत आहेत. बहुतेक शहरांमधून पुढे येत असलेले हे चित्र अतिशय विदारक आणि सुन्न करणारे आहे. माझी राज्य सरकारला पुन्हा विनंती आहे की, केंद्र सरकार रेल्वे देण्यास तयार आहे. या कामगारांना पायी जाण्यापासून तत्काळ रोखावे आणि केंद्र सरकारशी योग्य समन्वय साधून त्यांना रेल्वेने प्रवास करता येईल, अशी व्यवस्था करावी. औरंगाबादनजीक घडलेल्या घटनेनंतर तरी किमान यातून बोध घेण्याची नितांत गरज आहे”.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून १० रेल्वेगाड्या मुंबईतून उत्तर प्रदेशला जाणार असल्याचं सांगितलं आहे. “केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली. त्यांचे मन:पूर्वक आभार! त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी लगेच चर्चा केली. १० रेल्वेगाड्या मुंबईतून उत्तर प्रदेशला जाणार आहेत” अशी माहिती दिली. सोबतच सर्व कामगार बांधवांनी स्वतःची नोंदणी करून शासकीय व्यवस्थेतून प्रवास करावा. कृपया पायी चालत जाऊ नये अशी विनंती केली आहे.

आणखी वाचा- राज्य शासनानं स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतवण्याची व्यवस्था करावी : चंद्रकांत पाटील

रेल्वे दुर्घटनेत १६ मजुरांचा मृत्यू
लॉकडाउमुळे जालना येथील सळई निर्मिती कारखान्यात उत्पादन थांबविण्यात आल्याने मध्य प्रदेशात पायी जाण्यासाठी निघालेल्या १६ मजुरांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. हे सर्व मजूर मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे रुळांवरून चालत होते. रात्रभर चालून थकल्याने ते रुळांवरच झोपले होते. शुक्रवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास जाणाऱ्या मालगाडीखाली ते चिरडले गेले. औरंगाबाद शहराजवळील करमाड गावाजवळ ही दुर्घटना घडली.

Story img Loader