मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजर होते. बैठकीसाठी राज ठाकरे मंत्रालयात पोहोचले त्यावेळी त्यांनी मास्क घातला नव्हता. एकीकडे करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना वारंवार काळजी घेण्याचं आवाहन केलं जात असताना राज ठाकरे यांनी मास्क न घातल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. राज ठाकरे यांना याबद्दल विचारला असता सगळ्यांनी मास्क लावला आहे, त्यामुळे मी लावला नाही असं उत्तर दिलं.
करोनामुळे सर्वांनाचा मास्कचा वापर करण्यास सांगितलं जात असून तुम्ही मास्क का लावला नाही असं पत्रकारांनी विचारलं असता राज ठाकरे यांनी सांगितलं की ,“याचं कारण म्हणजे सगळ्यांनी मास्क लावला आहे, म्हणून मी लावला नाही”. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आमदार हितेंद्र ठाकूर तसंच इतर नेते उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी यावेळी लॉकडान संपेल तेव्हा एक्झिट प्लॅन काय असेल अशी विचारणा केली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी झालेल्या चर्चेसंबंधी माहिती दिली. यावेळी त्यांनी लॉकडाउनमुळे राज्य सोडून गेलेल्या परप्रांतीयांना तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात घेतलं जाऊ नये असा सल्ला दिला असल्याचं सांगितलं.
The CM Uddhav Thackeray called for an all party leaders meet keeping the coronavirus pandemic situation in mind. Along with other party leaders of Maharashtra, I too put up a few recommendations and points. Hoping the government looks into all these seriously. pic.twitter.com/791cXReN4m
— Raj Thackeray (@RajThackeray) May 7, 2020
लॉकडाउनसंबंधी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितलं की, “लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे? जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन कायम ठेवू शकत नाही. तो आयत्या वेळी सांगून उपयोग नाही. त्यामुळे लॉकडाउन कसा काढणार त्याची आधी कल्पना द्यावी. काय सुरु होईल, काय बंद राहणार हे लोकांना सांगावं. लॉकडाऊन बंद केला आणि संध्याकाळच्या विमानाने करोना गेला असं होणार नाही”.
आणखी वाचा- सरकारला कोणतीही मदत करण्यास आम्ही तयार, पण…– देवेंद्र फडणवीस
“परप्रांतीय कामगार परत आल्यावर तपासणी केल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जाऊ नये. त्या राज्यात काय परिस्थिती आहे याची आपल्याला कल्पना नाही. तसंच त्याच वेळी त्यांची राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ती वेळ आहे, नंतर ते करता येणार आहे. कारण आतापर्यंत जो गुंता झाला तो सोडवता येऊ शकतो,” असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. “गेले दीड महिना पोलीस थकले असून प्रचंड तणावाखाली आहेत. काही ठिकाणी पोलिसांना गृहीत धरलं जात आहे. अशा ठिकाणी एसआरपीएफ तैनात करावे. त्यामुळे दरारा निर्माण होईल. जेणेकरुन लोक बाहेर येणार नाहीत,” असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.