सुशांत मोरे, लोकसत्ता
टाळेबंदीत ठप्प झालेले व्यवहार, थंडावलेले दळण-वळण, अकल्पित परिस्थितीची भीती अशा काहीशा निराशाजनक वातावरणातही भविष्यातील सुरळीत दैनंदिन व्यवहारांची आशा अनेकांनी जागी ठेवली आहे. टाळेबंदी आता हळूहळू शिथिल होत आहे. लवकरच सर्व पूर्वपदावरही येईल. मात्र, गेल्या दोन-अडीच महिन्यांत अनेक व्यवस्था आणि सांस्कृतिक- ऐतिहासिक ठेवा काही हातांनी जपला आहे. मिळालेल्या शांततेचा उपयोग काही व्यवस्था करून घेत आहेत, तर काहींना येत्या काळातील आव्हाने भेडसावत आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये नसतानाही जपलेल्या अशाच काही व्यवस्थांचा हा मागोवा ‘.. तरीही कार्यरत’
मुंबई : करोनाच्या धास्तीने गेले दोन महिने मुंबईतील सर्वच व्यवहार थंडावले असले, तरी वेळ थांबलेली नाही याची जाणीव करून देणारे ‘टॉवर क्लॉक’ सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) सौंदर्यात भर घालणारे हे घडय़ाळ सुरू ठेवण्यासाठी टाळेबंदीच्या काळातही रेल्वेतील एक कर्मचारी रोज बदलापूरहून सीएसएमटीला जात आहे.
टाळेबंदीपूर्वी घडय़ाळाच्या काटय़ावर धावणारे मुंबईकर दररोज लाखोंच्या संख्येने उपनगरातून दक्षिण मुंबईत रोजचा प्रवास करीत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या कोणत्याही फलाटावर उतरले की प्रवाशाला दर्शन होई ते येथील इमारतीवरील नक्षीकाम, वैशिष्टय़पूर्ण बांधकामशैली याबरोबरच ‘टॉवर क्लॉक’चे. १८८८ सालात बसविण्यात आलेले हे घडय़ाळ टाळेबंदीच्या काळातही सुरू ठेवण्याचे श्रेय मध्य रेल्वेतील कर्मचारी महेंद्र सिंग आणि त्यांचे मदतनीस अमोल सावंत यांना जाते. टाळेबंदी हळूहळू शिथिल होत आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांच्या आव्हानात्मक काळात टॉवर क्लॉकबरोबरच सीएसएमटी स्थानकातील आणखी एक मेकॅनिकल आणि दोन इलेक्ट्रिक घडय़ाळे न चुकता नित्यनियमाने सुरू ठेवण्याचे काम या दोघांनी केले.
बदलापूरला राहणारे महेंद्र सिंग २००२ पासून मध्य रेल्वेच्या सीएसएमटीतील सिग्नल आणि टेलिकॉम कार्यालयात मास्टर कम्युनिकेशन मेकॅनिक या पदावर कार्यरत आहेत. ‘टॉवर क्लॉक’शिवाय २ व ३ नंबर फलाटासमोरील एक, तर दुसरे ५ आणि ६ नंबर फलाटासमोरील इलेक्ट्रिक घडय़ाळ, स्थानकातील तिकीट खिडक्यांजवळील स्टार चेंबरमधील मेकॅनिकल घडय़ाळ, रेल्वे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक आणि अन्य कार्यालयातील घडय़ाळांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम ते आणि त्यांचे साहाय्यक अमोल करतात.
हे सारे कसे होते?
टाळेबंदी होताच लोकल आणि मेल-एक्स्प्रेसही बंद झाली. पहिला आठवडा सुरू असलेली ही घडय़ाळे नंतर सुरू ठेवणे कठीण झाले. अखेर घडय़ाळे सुरू ठेवण्यासाठी परळ येथे राहणाऱ्या अमोल याला सीएसएमटीला जाण्यासाठी सिंग यांनी सांगितले. कधी दुचाकी किंवा बस असा मिळेल तो पर्याय पत्करून अमोल टॉवर क्लॉकपासून सर्व घडय़ाळे सुरू करत होते. कर्मचाऱ्यांसाठी जेव्हा गाडी सुरू झाली, तेव्हा दररोज बदलापूर ते सीएसएमटीपर्यंत सकाळी ५.५० ते ८.२० असा प्रवास सिंग करतात. नऊ डब्यांच्या विशेष मेलमधून प्रवास करताना असलेली कामगार, कर्मचाऱ्यांची गर्दी, एकमेकांना खेटून उभे राहताना करोनाची असलेली भीती, असे सगळे मागे सारून त्यांना घडय़ाळ सुरू ठेवण्यासाठी यावे लागते.
घडय़ाळाचे स्वरूप..
टॉवर क्लॉकची उंची १० फूट आहे, त्यातील मिनिट काटा साडेतीन फूट तर तास काटा अडीच फुटांचा आहे. या घडय़ाळाला एकदा चावी दिली की चार ते पाच दिवस सुरू राहते. त्यानंतर पुन्हा चावी दिली जाते. ही चावी म्हणजे त्याला जोडली गेलेली रोप वायर. स्टार चेंबर्समधील घडय़ाळही याच स्वरूपाचे. वरकरणी जुन्या घडय़ाळांना चावी देणे हे दीड, दोन मिनिटाचे काम वाटत असले तरी ते सोपे नाही. दोन मजले लिफ्टने आणि त्यानंतर जुन्या काळातील पायऱ्या चढून टॉवर क्लॉकपर्यंत पोचावे लागते.
काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेची विशेष गाडी धावू लागली. घडय़ाळांची देखभाल कशी होणार अशी चिंता मला सतावत होती. घडय़ाळापर्यंत कधी एकदा पोहोचतो असे झाले होते. आता हा नव्याने सुरू झालेला रेल्वेप्रवास अंगवळणी पडलाय आणि मनातील चिंताही कमी झाली आहे. सध्या स्थानकात वर्दळ नसते, इतर कामेही कमी असल्याने स्थानकातील घडय़ाळ्यांचे ऑयलिंग, दोन मेकॅनिकल घडय़ाळांना चावी देणे आणि अन्य दोन इलेक्ट्रिकल घडय़ाळांची देखभाल सहज होते.
– महेंद्र सिंग, रेल्वे कर्मचारी