करोनाच्या दुसऱ्या लाटेनं राज्यात थैमान घातलं होतं. अचानक उद्रेक झाल्यानं राज्यात दुसऱ्या लाटेच्या काळात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. मात्र, आता दुसरी लाटही हळूहळू ओसरू लागली आहे. असं असलं, तरी डेल्टा प्लस या नव्या करोना विषाणुमुळे तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध वाढवले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही वाढत्या गर्दीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “ऑक्सिजनचा तुटवडा, बेडचा तुटवडा आदींसाठी तारेवरची कसरत करत आपण दुसरी लाट थोपवली. खाली आणली. मात्र, दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही. खाली आहे आणि स्थिरावली आहे. पण, आता पुन्हा गर्दी होऊ लागली आहे,” असं सांगत मुख्यमंत्र्यांनी गर्दी करणाऱ्यांना धोक्याचा इशारा दिला.
मालाड येथील कोविड केअर सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “कलानगराला लागूनच एमएमआरडीएचा रस्ता झाला. त्यावर उड्डाणपूल झाला. मग धारावीचा रस्ता झाला. जिथे मोजक्याच गाड्या दिसत होत्या तिथंही आज वाहतूक कोंडी होत आहे. रहदारी वाढत असल्याने ट्राफिक वाढत चाललं आहे. त्यावर आज तोडगा काढला आहे. एमएमआरडीएचं कार्यालयं झालं, तिथं त्याचा फायदा झाला म्हणून ट्राफिक जाम होणाऱ्या ठिकाणी एमएमआरडीएची कार्यालये सुरू करायची का?, असं मिश्कील भाष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. विस्तारत चाललेल्या मुंबईसाठी मार्ग काढले जात आहे, याबद्दल मी एमएमआरडीएचं मुंबईकरांच्या वतीने कौतुक करतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा – Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात आजपासून पुन्हा निर्बंध कठोर
“ट्राफिक जामवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यात आला. त्याचप्रमाणे आणखी एक चांगली गोष्ट पूर्ण झाली आहे. मालाड येथे कोविड केअर सेंटर. आज लाट ओसरली आहे. आपल्याकडे बेड रिकामे पडले आहेत, तरी देखील हे तुम्ही का करता आहात? असा प्रश्न काहीजण विचारू शकतात. पण, असा प्रश्न विचारणाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट येत नाही की, करोनाचा शिरकाव झाल्यानंतरच फिल्ड हॉस्पिटलचा विषय मांडण्यात आला होता. देशातील पहिलं फिल्ड हॉस्पिटल वांद्रे-कुर्ला संकुलात उभारण्यात आलं. त्याची क्षमता दोन हजार रुग्णांची आहे. अशी सेटर राज्यभर केली जात आहेत,” असं मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा- कोल्हापूर : दुकाने सुरु करण्यावरुन व्यापारी आणि पोलीस प्रशासन आमने-सामने
“आज गरज नसताना असं का केलं जात आहे, असा सहज प्रश्न कुणालाही पडेल, पण तसं नाही. दुसरी लाट बघितली, तर ऑक्सिजनचा तुटवडा, बेडचा तुटवडा आदींसाठी तारेवरची कसरत करत आपण दुसरी लाट थोपवली. खाली आणली. मात्र, दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही. खाली आहे आणि स्थिरावली आहे. पण, आता पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. तिसरी लाट कधी येईल हे सांगता येत नाही. पण गर्दी पहाता दुसरी लाट उलटेन का? हा मोठा धोका आहे. याचं कारण दुसऱ्या लाटेचा विषाणू डेल्टा आहे. आणि आता डेल्टा प्लस आढळून आला आहे. डेल्टा प्लसने अजून रंग दाखवलेले नाहीत. पण, डेल्टाच अजूनही राज्यात आहे. गर्दी टाळली गेली नाही, तर दुसरी लाट ओसरण्याऐवजी उलटेन. ही शक्यता गृहित धरली, तर आज जे आपण करतो आहोत, त्याचं महत्त्व नागरिकांच्या लक्षात येईल,” असा इशारा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या गर्दीबद्दल चिंता व्यक्त केली.